सोन्याची चिंच (भयकथा)

marathi katha / marathi horror stories

sonyachi-chinch-marathi-story

सोन्याची चिंच

“आत्ता खूप झालं र शिरप्या….गाव सोडल्या बगर काय बी व्हायचं नाही…..!”

“व्हय र सदया तू म्हणतुस ते बरोबर आहेस.”

डोंगर पायथ्याशी पन्नास एक घराचं ते गाव दिवसान दिवस वसाळ होत चाललेले. अन्नाच्या शोधार्थ गेलेले बरेचशे नवतरुण पिढीचे वापस यायचे चिंनच दिसत नव्हते. जे गेले ते तिकडेच वसले.

म्हणून का तर गावाला आता गाव पण राहिलेल नव्हत.
या सर्व गोष्टीचा विचार करणारे हे दोन मित्र शिरपा आणि सदा नेहमी पारावर येऊन बसायचे.
काही पर्याय न मिळाल्याने दोघांनी पण गाव सोडण्याचा निर्णय केला. व एक दिवस ठरून दोघांनी पण घर सोडले.

तारुण्यात प्रदार्पण केलेले हे दोघे अंगात मळलेला सदरा आणि धोती या वेशात निघाले, नवीन प्रदेशाची वाट धरत.

आपल्या राज्या पेक्षा दुसऱ्या राज्यात काही वेगळाच असत, हे त्यांनी ऐकल होत. पण ते प्रत्येक्षात बघायला त्यांना आत्ता संधी मिळणार होती.

झाडी, झुडपे बाजूला सावरत दोघे पण आपली वाट काढत पुढे पुढे निघाले.
आत्ता घनदाट जंगलाची सुरुवात झाली होती. उंच उंच झाडे आणि वेलींनी जणू डोक्यावर हिरवा मंडप चढवला होता.

अधून मधून ऐकू येणार खळखळ वाहणार नदीच पाणी मन तृप्त करत होत, त्यालाच साद घालणारी पक्षांचा आवाज जणू मन त्या बरोबर सैरावैरा पळत सुटायचं, पण अचानक आलेल्या श्वापदाचा आवाज काळजाचा ठोका चुकवायचा.

दुपार असून दुपार न जाणवणारी ती जंगली वाट दोघांसाठी नवीनच होती. दोघे पण कुतूहलाने बघत एक एक पाऊल पुढे सरकत होते.

बराच काळ चालल्याने दोघांनी एका झाडाखाली विश्रांती घायचे ठरवले.

“कार्र… सदया आपण गाव सोडून काही चूक तर नाय केली…?” शिरप्या झाडाखालची जागा चाचपडत म्हणाला.

“नाय…र….! केव्हा तर आपल्याला गाव सोडावस लागलं असत की..!” सदा खाली अंग टाकत पूर्ण वाक्य बोलणारच तर त्याच लक्ष समोरील झाडाखाली गेलं.

त्याने झोपलेल्या शिरप्याला मानेन खुणावत म्हणाला. ते समोर च्या झाडाखाली बघ.!

दोघे पण डोळे विस्फारून झाडाखाली बघत होते.
अस्पस्ट आकृती त्यांना बसलेली दिसली.

दोघांच्या पण काळजाचा ठोका चुकला. सदया आणि शिरप्या एकमेकांच्या तोंडकडे आवासून बघत होते.

न राहून सदया म्हणाला. “चल जाऊन बघू कोण आहे ते?”

दोघेही पुरते घाबरले होते, त्यात अजून घनदाट जंगलात दिवस रात्रीचा फरक करायला, उंच झाडाच्या फांद्या च्या मधून चोर वाटेने निघणार थोडाच प्रकाश होता.

ते आत्ता एक एक पाऊल पुढेपुढे सरकत जात होते. दुरून दिसणारी ती अस्पस्ट आकृतीत भीती दायक भासत होती.

जीवात जीव साठून घाम टिपत ते दोघे एक एक पाऊल पुढे टाकत होते. ती अस्पस्ट आकृती त्यांना आता स्पस्ट दिसत होती.

एक तपस्वी तपात मग्न दिसत होता. लांब शातीवर रुळत असलेली पांढरी दाढी खूप वृद्ध असल्याची जाणीव करत होती.

कोणी जणू हाडांचा ठेवलेला सापळा भासत होता. पांढऱ्या धोत्रातील ती व्यक्ती जुनी पण चेहऱ्यावर मात्र लख्ख तेज पसरवत होती.

दोघांनी पण निस्वास सोडला. आत्ता पुढे जाऊन बघण्यात काही फायदा नाही, हे ते दोघे जाणताच त्यांनी आपल परतीचं पाऊल मग टाकलं.

टाकलेलं पाऊल हे एक वाळलेल्या झाडाच्या फांदी वर पळताच “कर्रर्रर्र “कसा आवाज झाला. तसेच दोघेही जाग्यावर स्तब्ध झालेत.

मागे वळून पाहण्यात दोघांची पण हिम्मत होत नव्हती. पण सदयाने हळूच मान मागे वळवली. ज्याची भीती होती तेच झालं.
त्या तपस्वी चे डोळे सटाल उघडले होते.

“कोण तुम्ही….?” स्वतःच राग सावरतच तो तपस्वी म्हणाला.

“आम्ही बाजूच्या शिवापूर वरून आलोय!” शिरप्या घाबर्या स्वरात म्हणाला.

“मग इथे कुठे आलात….!” करड्या स्वरात तो म्हणाला.

“अन्नाच्या शोधार्थ आलोय महाराज…!” सदया नम्रपणे म्हणाला.
त्याच्या या वाक्याला तो तपस्वी हसायला लागला.

“म्हणजे तुम्ही पण वाट चुकलाच तर….!”

“म्हणजी महाराज…आम्ही काही बी समजलो नाही!”

“तुम्हाला काही बी समजणार नाही यातलं…कारण तुम्हाला अजून काही कळलच नाही.! तुम्ही चक्रात अडकला.!” परत त्या तापस्वाच्या चेहऱ्यावर हास्य झळकत होते.

“आमच्या टकुर्यात घुसला असं काही सांगाल का?” शिरपा चिडतच म्हणाला. चिडलेल्या शिरप्याला सदया सांभाळत म्हणाला.

“महाराज त्याच्याकडे लक्ष नका देऊ…त्या कडून शमा मी मागतो..पण असं आम्हासनी कोड्यात पाडू नकास.!”

“समजदार दिसतोस…..तर ऐक लक्ष देऊन आणि तुझ्या या मित्राला पण सांग….तुम्हाला चकवा लागलाय, तुम्ही इथून निधान बराच वेळेस गेला असेल पण तुम्हाला ते नाही कळलं.”

“म्या नाही समाजोलो…..!” शिरपा डोक्यावर आट्या पाळतच म्हणाला.

“धीर धर सर्व सांगतो…..तुमची शिकार त्या चकव्याने केलीच असती पण तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही त्या झाडाखाली झोपलात….!”

“तुम्हास नी कस माहीत की आम्ही त्या झाडाखाली झोपलो होतो ते.” शिरप्या मधातच बोलला.

परत त्या तापस्वाच्या चेहऱ्यावर स्मित होत…तो पुढे म्हणाला.

“कारण तुम्ही त्या झाडाच्या आश्रयाला गेलेत, तेव्हा तो चकवा तेथून निघून गेला. तेव्हाच मी तुम्हाला दिसलो, असेल कारण त्या झाडाच्या आश्रयाविना मी तुम्हाला दिसणे शक्यच नव्हते. कारण चकवा जे तुम्हाला दाखवेल तेच तुम्हाला दिसणार.”

“पण महाराज त्या झाडाखालीच का तो चकवा पडून गेलाय” सदा ने नम्र पणे विचारलं.

“कारण त्या झाडाखाली मी विश्रांती करतो, त्या जागी माझा सहवास असल्या कारणाने ती जागा पवित्र झाली आहे, त्यामुळे त्याची शक्ती तेथे चालत नाही. “

तपस्वीचे हे वाक्य ऐकताच शिरपा खाली मान घालून हसायला लागला. सदया शिरपाला न हसण्यासाठी खुणावत होता. पण शिरप्यावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही.
तपस्वी हा सर्व प्रकार मंद स्मित करून पाहत होते.

प्रसंग टाळण्यासाठी सदया अचानक बोलला.

“महाराज क्षमा असावी…! मग आम्ही पुढं कस जायचं? ते जे काही आहे, ते आम्हांसनी पुढं कस जाऊ देईल…!”

सदयाचे वाक्य मधातच तोडत तपस्वी म्हणाले.

“चकवा……तो चकवा आहे.!”

सदया आपल्या वाक्यात सुधारणा करत परत म्हणाला.

“तो चकवा आम्हांसनी पुढं कस जाऊ द्यायचा….?”

“त्याची चिंता तुम्ही करू नका. त्याचा उपाय आहे माझ्याकडे…!”

सदया आणि शिरप्या च्या हातात काडीचे दोन छोटे छोटे तुकडे देत तपस्वी म्हणाले.

“हे घ्या काडीचे तुकडे, आणि ते स्वतः जवळ ठेवा! हे त्याचं झाडाची काडी आहे, ज्या झाडाखाली थोड्या वेळा आधी तुम्ही विश्राती घेतली आहे?”

हे ऐकताच सदया आणि शिरप्याच्या लक्षात आले की, यामुळे आपले रक्षण होणार ते….

तपस्वी परत म्हणाले….”तुम्हा दोघांना भेटून मी खूप प्रसन्न झालो. त्यामुळे तुम्हाला आत्ता जास्त कष्ट नाही घ्यावे लागणार…..!”

शिरप्या अचानक म्हणाला. “म्हंजी महाराज….?”

तपस्वी म्हणाले. “मी तुम्हाला एक गूढ सांगणार आहे.!”

गूढ हा शब्द ऐकताच दोघांनी आपापले कान टवकारले.

तपस्वी पुढे म्हणाले. “घाबरू नका ते गूढ तुमच्या हिताचेच आहे. फक्त लक्ष देऊन ऐका…..!”

तपस्वी पुढे सांगायला लागले. “इथून काही अंतर चालत गेल्यावर तुम्हाला एक नदी लागेल! त्या नदी….”

परत तपस्वी चे वाक्य मधात तोडत शिरप्या म्हणाला. “ती नदी आम्हांसनी गावावरून येतानाच लागली.”

तपस्वी नी परत मंद स्मित केले. व पुढे म्हणाले.
“तुम्ही विसरलात….तुम्हाला चकवा लागलेला होता. ती नदी मागे नसून ती परत आत्ता तुम्हाला पुढे लागणार आहे.!”

हे ऐकताच शिरपा गप्प बसला.
तपस्वी परत पुढे सांगायला लागले.

“नदी दिसताच तेथून पश्चिमेस बघितल्यावर तुम्हाला दुरून एक भव्य असे चिंचे चे झाड दिसेल.
ते झाड तुम्हाला दिसणार खूप जवळ पण तेथे पोहचायला तुम्हाला रात्र नक्कीच होणार..!”

“त्या झाडाच्या तुम्ही जस जसे जवळ जाल तस तसे ते तुम्हाला आकर्षित करणार…कारण ते काहीं साधसूध चिंचेचं झाड नसून सोन्याचं चिंचेचं झाड आहे!”

शिरपा आणि सदाच्या आ…..वासून पाहत असलेल्या चेहऱ्याकडे बघून परत ते म्हणाले. “हो…..मी जे बोलत आहे ते सत्य आहे. ते झाड सोन्याचे आहे, व त्याला चिंचा पण सोन्याच्या येतात.

तुम्ही त्या सोन्याच्या चिंचा घेऊन स्वतःचा उदरनिर्वाह करू शकाल.!”

हे ऐकताच दोघांच्या अंगावर काटाच उमटला व अति उत्साहात येऊन शिरप्या म्हणाला.
” मग येळ कशास वाया घालवायची. आम्ही लगीच निघतो मग…! आणि तुमच्यासनी पण थोड्या सोन्याच्या चिंचा घेऊन येतोय..!”

तपस्वी स्मित करत परत म्हणाले. “ते इतकं सोप्प वाटलं का तुला…?
तू माझी पूर्ण गोष्ट ऐकलीस कुठं…?” तपस्वी कोड्यात बोलत होते.

सदा शिरपाला गप्प बसवत तपस्वीनां नम्रपणे म्हणाला.
“मग महाराज त्यामागे अजून काय सत्य आहे, ते आम्हांसनी उलगडा कराल काय…?”

तपस्वी डोक्यावर आट्या पाळत सांगू लागले.

“त्या झाडाच्या संरक्षणास एक हडळ त्या झाडावर राहते. ती अशी सहजासहजी तुम्हाला तेथून सोन्याच्या चिंचाच नेवू काय? तर तेथून तुम्ही विना चिंचेचे पण परत वापस नाही येवू शकणार.”

“हडळ….!” शिरप्या आणि सदया आचार्य चकित होऊन ओरडले.

” नको….रे….. बाबा त्या हडळी च्या तावळीत सापडून मेल्या पेक्षा आम्ही उपाशी राहून मरेन.!” सदया आपली नजर सरवैर पळवत म्हणाला.

” हो….. हो….नको ते सोने आम्हांसनी….”
शिरप्या पण सदयाला साद घालत म्हणाला.

तपस्वी स्मित करत म्हणाले. “ती हडळ नेहमी त्या झाडावरच राहत नाही. ती त्या झाडाच्या आवारात असलेल्या जंगलात फिरते. त्यामुळे तुम्हाला सोन्याच्या चिंचा आणायची संधी आहे.” तपस्वी आत्मविश्वासानं म्हणाले.

“म्हणजे ती झाड सोडून पण जाते?” शिरप्या उत्साहित होऊन म्हणाला.

“हो……म्हणूनच म्हणतोय…की ती जेव्हा झाडावर नसणार तेव्हा तुम्ही झाडाखाली पडलेल्या सोन्याच्या चिंचा वेचून परत वापस येऊ शकता.

फक्त ती यायच्या आधी तुम्हाला तेथून निघावं लागेल. त्यावेळेस लालूच तुमचा सर्वात मोठा शत्रू असेल. जास्त चिंचा घ्यायच्या लालसेपाई तुम्ही स्वतःचा घात करून घेसाल.

म्हणून जितके आवश्यक आहे तितकेच चिंचा घेऊन ती जागा सोडायची.” तपस्वी नि एकाच स्वासात सांगून टाकले.

शिरपा आणि सदा एकमेकांच्या तोंडाकडे एकटक पाहतच राहिले.

थोडा वेळ थांबून शिरप्या म्हणाला. ” ठीक आहे आम्ही जाणार आणि तेथून सुखरूप चिंचा घेऊन गावी बी परतणार!

परंतु सदया अजून देखील शून्यात पाहत होता जणू त्याला हे मान्य नव्हतं.

परंतु शिरप्याच्या हट्टापायी त्याची एक नाही चालली. तपस्वी चा सल्ला घेऊन दोघेही आपल्या प्रवासाला सुरुवात करणार होते.

ते त्या तपस्वी पासून निघणारच तेव्हा परत तपस्वीच्या वाक्यामुळं त्याच्या अंगावर वीज कोसळली.

” तुम्हाला काय वाटलं की, तुमच्या गावाकडली मंडळी जी काम शोधायला दुसऱ्या राज्यात गेली. ती काय पोहचली असेल त्यांच्या इच्छित स्थळी….? नाही…..त्या सर्वांना या चकव्याने गिळंकृत केलेलं आहे.”

तुमच्या प्रवासात त्यांचे अवशेष तुम्हाला दिसतीलच.” हे ऐकताच दोघांच्या अंगाला दरदरून घाम फुटला.

पण करणार काय निपचुप आपली खाली मान घालून दोघे तपस्वी नि त्यांना शेवट दिलेल्या धक्याचा विचारात बुडून चालू लागले.

तपस्वीनीं सांगितल्याप्रमाणे त्यांना मानवाच्या हाडांचे अवशेष त्याच्या प्रवासात दिसत होते. त्याच्या मनात निराशा आणि दुःखाची लहर निर्माण झाली.

पण करणार तरी काय गावाला जाऊन उपासमारीने मरण्यापेक्षा पुढचा प्रवास योग्य राहील.

तपस्वीनीं सांगितल्याप्रमाणे त्यांनी तो प्रवास नेमका तसाच पार केला. व त्यांना ती सोन्याची चिंच दिसली.
दोघांनाही अत्यानंद झाला. त्यांनी चिंचेच्या दिशेने आपला प्रवास कायम चालू ठेवला.

आत्ता ती चिंच त्याच्या थोड्याच अंतरावर होती. तेथे पोहचेपर्यंत त्यांना तपस्वीनीं सांगितल्याप्रमाणे रात्र झालीच होती.

आत्ता फक्त त्यांना एखादी सुरक्षित जागा बघून दबा धरून बसायचे होते. आणि त्यांना तशी जागा दिसली देखील.

चिंचेच्या जवळच असलेल्या दुसऱ्या झाडाच्या पाठीमागे ते दोघे आपल्या गुडघ्यावर लपून बसले.
त्या झाडाचे दृश्य ते लक्षपूर्वक न्याहाळत होते.

त्यांचा तर या दृश्यावर विश्वासच बसत नव्हता की, सोन्याचं झाड वैगरे असा काही प्रकार असतो ते.

बराच वेळ ते काही न बोलता फक्त त्या सोन्याच्या झाडामध्ये हरपून गेलेले होते.

पौर्णिमेच्या चंद्रात ते झाड लख्ख प्रकाशात नाहून निघालं होत. त्याच प्रकाशात खाली पडलेल्या चिंचेचा सडा त्यांना स्वतःकडे बोलावत असण्याचा आमंत्रण देत असल्यासारखे भासत होते.

भयाण शांततेत रातकीटकाच्या आवाजाने त्या जागेवर एक भीतीची सावट घातलेली होती.

दोघांची नजर त्या जागेवर बसून कशाची तरी शोध घेत होती. आणि ज्या अनामिक वस्तुस्थिती च्या दर्शनास ते तेथे दबा धरून बसलेले होते ते त्यांना जशास तशी त्या सोन्याच्या झाडावर दिसली.

दोघांच्या छातीत चर्रर्रर्र झालं. कल्पना शक्तीच्या पलीकडे असलेल्या त्या आकृतीचे त्यांना दर्शन झाले.

हातातील लाल बांगड्या आणि पांढऱ्या साडीत असलेले तिचे संपूर्ण पांढरे शरीर सोनेरी प्रकाशात लख्ख चमकत होते.

झुळुकाने तिचे सुटलेले केस स्वतःच्या चेहऱ्यावर काळ्या सावलीसारखी सैरावैरा पळत होते.

डोळ्याच्या जागी डोळे नसून रिकामे काळे खोबने पडलेले होते.
झाडाचं पान जस हवेत अलगद उडते तशी ती आकृती त्या झाडाभवती हवेत गिरक्या मारत होती. जणू काही कोणाच्या आगमनाची वाट पाहत असावी.

इतके अक्राळ विक्राळ हडळीचे रूप पाहून दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या कर्कश हसण्यामुळे भीतीत अजून भर पळत होती.

हसण्याच्या आवाजाने आजूबाजूचा सर्व परिसर भयानक भासत होता.
दोघेही स्तब्ध होऊन हा सर्व प्रकार पाहत होते. त्यांना कळत नव्हते की आत्ता काय करायचे.

ते तेथून पळून सुद्धा जाऊ शकत नव्हते. कारण पळताना ते तिला सहज दिसू शकले असते. दिवस निघाल्याशिवाय त्याच्याकडे काही गत्यंतर नव्हते.

शांत बसून राहण्यातच त्यांचा लाभ होता. तपस्वी ने सांगितल्याप्रमाणे काही वेळानंतर ती हडळ त्या झाडावरून उडून जंगलात गेली.

हीच ती योग्य वेळ होती की, ते त्या सोन्याच्या झाडाखाली जाऊन सोन्याच्या चिंचा वेचून परत येऊ शकत होती. परंतु त्यांनी निर्णय घेतला की ते त्या झाडाखाली जाणार नाहीत.

पण लालचेपायी त्यांची एक नाही चालली. त्यांना ते सोन्याचे झाड आकर्षित करतच होते.
न राहून शिरप्या हळूच लपलेल्या झाडामागून निघाला.

त्याच्याच पाठीमागे सदया पण बाहेर पडला. एकएक पाऊल पुढे टाकत दोघेही स्वतः आणि झाडाच्या मधातील अंतर कमी करू लागले.

त्यांच्या पाऊला खाली आलेला सुकलेला पाला कर्रर्रर्रर कर्रर्रर्रर असा आवाज करत होता. त्यांची नजर सैरावैरा पडत होती.

एक जरी चूक झाली तर ती त्यांच्या जीवावर बेतणार होती.
सारखी मनात एक भीती होती. अचानक ती आली तर…

झाडातील आणि त्यांच्यातील अंतर कमी-कमी होत होते. तसतसा तिचा विद्रुप चेहरा त्याच्या समोर येत होता.

आजूबाजूच्या परिसरात मानवाच्या शरीराचे सापडे पडलेले त्यांना दिसत होते. नक्कीच ते या हडळी चे शिकार झालेले असणार.

त्याच्या मनात एक निराश तयार झाली पण थोड्याच अंतरावर त्यांचं स्वप्न पूर्ण होणार होत. त्या सोन्याच्या चिंचा त्याच्या हातात लागणारच होत्या.

एकदाचे ते झाडाखाली पोहचले व क्षणाचा पण विलंब न करता त्यांनी आपापल्या कमरेला बांधलेला दुपट्टा सोडून त्यात सोन्याच्या चिंचा भरायला लागले.

विश्वास बसत नव्हता की हे खरच सत्य आहे. शिरप्या तर चिंचा उलटून पालटून पाहू लागला.

“ही येळ योग्य नाही… ते बघाया…!”
सदया चिंचा भरता भरता गडबळीत म्हणाला.

संपूर्ण आयुष्य आरामात जाईल इतक्या चिंचा दोघांनी पण गोळा केलेल्या होत्या.
सदया गडबडीत चिंचेची भरलेली पोठडी बांधत शिरप्या ला म्हणाला.
” चल लवकर ती केव्हाही येऊ शकते.”

शिरप्या ने त्याच्या बोलण्याकडे लक्ष नाही दिलं. शिरप्या खाली मान घालून अदाश्यासारखे चिंचा वेचायला लागला. सदया त्यांच्या शेजारी उभा राहून त्याला तेथून चालण्यासाठी वारंवार बजावून सांगू लागला.

शेवटी सदया ने शिरप्या चा हात धरून खेचायला सुरुवात केली. त्यालाच प्रतिकार म्हणून का तर शिरप्या त्याला हुसकावून लावले.

हा प्रकार बऱ्याच वेळा पर्यत चालला.
“तू जा इथंन मी येतोच तुझ्या मागणं!” शिरप्या जोरात खेकसावुन म्हणाला.

शेवटी सदया कडे काहीच पर्याय नसल्याकारणाने तो म्हणाला.
“मी जातो पुढ तू लगीच माझ्या मागणं ये…..!”

हे वाक्य नक्कीच शिरप्या च्या कानावरून गेलेलं असेल हे सदयाच्या लक्षात आले.
सदया आधीच्या जागी जाऊन लपून बसला.

तो आत्ता शिरप्याचा वेंधळ पणा दुरून बघत होता. आणि मनातल्या मनात विचार करत होता की तपस्वी ने सांगितल्याप्रमाणे शिरप्यावर सोन्याच्या चिंचा बद्दल लोभ तयार होताना सदया बघत होता.

सदया मनातल्या मनात प्रार्थना करत होता की, ती हडळ वापस यायच्या आधी शिरप्या जाग्यावर परत आला पाहिजे.

शिरप्याला कितीक चिंचा गोळा करू असे झाले होते.
शिरप्याच्या अचानक तिरपी नजर दूरवर असलेल्या आकृतीवर पडली.

तसाच तो अचानक भानावर आला. अलगद हवेत तरंगत येणारी ती आकृती हडळी ची होती.

हवेत येत असलेल्या तिचे रूप अधीकच भयानक भासत होते.
झाडामागून हे दृश्य सदयाने देखील बघितले. तो जोरात ओरडला.
“शिरप्या निघ तिथन….!”

शिरप्या लघबघित तेथून पळत जाऊन चिंचेच्या शेजारीच असलेल्या झाडामागे जाऊन लपून बसला.
सदया एका झाडामागे तर शिरप्या दुसऱ्या झाडामागे असा दोघांचा पवित्रा होता.

शिरप्या लपतो नि लपतो तर ती हडळ त्या सोन्याच्या चिंचे च्या झाडापाशी येऊन ठेपली. आणि ती त्या झाडाच्या गोलगोल फिरू लागली.
सदया आणि शिरप्या हे दृश्य अलग अलग जागेतून बघत होते.

शिरप्या ने केलेली चूक सदया आणि हडळी च्या एकाच वेळी लक्षात आली. जेव्हा हडळी चे लक्ष जमिनीवर ठेवलेल्या कापडाकडे गेली. ते शिरप्याच्या लक्षात येताच त्याला दरदरून घाम फुटला.

शिरप्याचा गडबळीत सोन्याच्या चिंचा जमा केलेला कापड तेथेच होता. आणि त्यावर नगण्य चिंचा रचून ठेवलेल्या होत्या.

संपूर्ण वातावरणात कर्कश असा आवाज घुमला. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण राक्षसी हास्य तयार झाले होते.

” लपून बसण्यात आत्ता काही उपयोग नाही तू माझ्या तावडीतून नाही सुटू शकणार. हा…..हा…..हा….” हडळ आनंदाच्या गिरक्या घेत म्हणाली.

शिरप्या आणि सदयाच्या आता पार जीवावर बेतली होती. त्यात शिरप्याची परिस्तिथी सदया पेक्षा खराब होती. कारण सदया पेक्षा शिरप्याच्या हडळ जवळ होती.

शिरप्याला ती स्पष्ट स्पष्ट झाडामागून दिसत होती. त्याच्या हृदयाचे ठोके झोरात वाढले. जेव्हा ती आजूबाजूच्या झाडामागे जाऊन बघू लागली.

“मला माहित आहे तू इथेच कुठे लपून बसलेला आहे.” तुला मी शोधून काढणारच …..हा……हा……हा……” हडळी च्या आवाजाने सर्वत्र परिसरात भीतीयुक्त वातावरण तयार झालं.
त्यात रातकीटकाच्या आवाजाने अजूनच मनात भीतीने घर तयार केलं.

हडळी ने एक एक झाड शोधून काढण्याचा मोर्चा चालू केलेला होता. सदयाला काही घाबरण्याचे कारण नव्हते तो त्या चिंचेपासून खूप लांब अंतरावर असलेल्या झाडामागे लपलेला होता.
पण त्याचा जीव शिरप्या साठी तुटत होता.

एक वेळ अशी आली की हडळी ची पाठ शिरप्या कडे होती.
तीच योग्य वेळ होती.

जी शिरप्याला झाड सोडून दुसरीकडे आश्रय घ्यायची. तो त्यावेळचा फायदा घेऊन सहज सदया कडे जाऊ शकला असता पण त्याने दुसरा पर्याय निवडला.

तो सरळ त्याच्या रचवलेल्या सोन्याच्या चिंचेच्या रास कडे धावला. आणि आपला दुपट्टा गुंडाळत तो लगेच सोन्याच्या चिंचेच्या झाडामागे जाऊन लपला.

सदयाच्या लक्षात आलेली शिरप्या ची ही चूक त्याला खूप महागात पडणार होती.
तितक्या वेळेत हडळ परत पालटून त्या सोन्याच्या झाडाजवळ आली.

तेथे झालेला बदल तिच्या लगेच लक्षात आला. तो कापड आणि ती सोन्याच्या चिंचेची रास तेथून गायब झालेली तिला दिसली.

परत तिच्या अमानुष हास्यात सर्व जंगल दणाणून निघाले.

आत्ता हडळी ला कळून चुकलेला होत की आपली शिकार नक्कीच जवळ कुठे तरी लपून बसलेली आहे.
परत तिची राहिलेली झाडांची शोधमोहीम चालू झाली. इकडे शिरप्याची पार घाबरगुंडी उडाली होती. चंद्राच्या सरकण्याच्या कलेवरून तर मध्यरात्र झालेली दर्शवत होती.

“तुला काय वाटतंय….तू इथं स्वतः आलास….? शक्यच नाही….! तुला तर चकवा लागलाय चकवा….! तो पण तपस्व्याचा….हा….हा….हा….हा…..”

हडळीच्या या वाक्याने आत्ता दोघांचे डोकेच बधिर झाले. शिरप्या आणि सदया ला आत्ता कळून चुकले की तपस्वी म्हणून आपण ज्याच्या सोबत संभाषण केले तो तपस्वी नसून एक चकवा होता.

सदया ज्या जागेला सुरक्षित समजत होता. ती आता सुरक्षित नसल्याचे त्याला कळले होते.

हडळ हवेत फिरत होती. आणि ती सर्वत्र त्याचा शोध घेत होती. बराच वेळ शोधून काही न मिळाल्याने ती रागात प्रत्येक झाडावर आपल्या हाताच्या लांब नखांनी घाव घालायला सुरुवात केली होती.

अचानक ती थांबली. जणू काही तिच्या लक्षात आले. तिचे फक्त सोन्याचे झाड एक तितके बघायचे बाकी होते. एकाच झेपेत तिने ते सोन्याचे झाड गाठले. ज्या मागे शिरप्या लपून बसला होता.

सोन्याच्या झाडाकडे हडळ येत असल्याचे शिरप्याला दिसली. आत्ता त्याच्याकडे काहीच पर्याय नव्हता त्याने स्वतःचे डोळे बंद करून घेतले आणि देवाच्या नामाचा जप करू लागला.

बऱ्याच वेळेपर्यंत त्याने आपले डोळे बंद केले. पण त्याच्या जवळ काहीच हालचाल नाही झाली. न राहून त्याने हळूच आपला एक डोळा उघडून बघितला.

आणि वस्तुस्थिती ची पडताळणी घ्यायला त्याने झाडाला पाठ टेकून हळूच डोकावून पाहिले.

सगळीकडे शांतता होती. त्याने सर्वत्र आपली नजर फिरून बघितले तर त्याला ती दिसली नाही. शिरप्याने सुटकेचा स्वास सोडला. परत मागे वळून बघताच ती त्याच्या अगदी तोंडासमोर हास्य करत उभी होती.

“हा…..हा…..हा…..हा……”

शिरप्याचा किंकाळी फोडण्याचा आवाज सदया च्या कानांवर पडला. ” सदया…………स…स…स……”

त्याच क्षणी सदया ओरडला. “शिरप्या……….”

सदयाला त्या चिंचेमागच दृश्य दिसू शकत नव्हते. पण तो त्या किंकाळी वरून अंदाज बाधू शकत होता की तेथील दृश्य खूपच भयानक असणार.

बराच वेळ शांतता पसरली. सदया त्या झाडाकडे एकटक पाहत होता. काहीच हालचाल होत नव्हती. थोड्या वेळाने त्या झाडामागून ती हडळ हळूच बाहेर आली.

बघतोतर काय तिचे दोन्ही हात रक्ताने माखलेले होते. आणि एका हाताने शिरप्याचा पाय खेचत ती त्याला फरफटत झाडावर घेऊन जात होती.

त्या सोनेरी झाडावरून एक रक्ताचा पाट खालच्या दिशेने निघाला होता. त्याचे अर्ध मेलेलं शरीर तिने त्या झाडावर उंच अश्या जागेवर नेऊन ठेवलं.

सदया ने जोरात हंबरडा फोडला. शिरप्या सारखा मित्र आपण गमावून बसलो हे त्याला कळले. सदया दोन पायाच्या मधात डोकं खुपसून जोरजोरात रडू लागला.

बराच वेळ रडून झाल्यावर सदया भानावर आला. त्याने हळूच आपली मान वर करून सोन्याच्या झाडाकडे केली. शिरप्या च मृत शरीर त्या झाडावरच त्याला टांगलेल दिसलं.

पण याची नजर सर्वत्र जिला शोधत होती ती त्याला तेथे नाही दिसली. सदया ला आत्ता चांगलाच दरदरून घाम सुटला.

अचानक त्याच्या खांद्यावर पाण्याचे थेंब पडल्यासारखे जाणवले. तेच तो जाणून घेण्यासाठी स्वतःची मान खांद्याकडे वळवली, तसेच त्याचे डोळे विस्फारले.
ते पाणी नसून रक्ताचे थेंब होते. त्याच्या संपूर्ण शरीरात कंप निर्माण झाला.

वरून खांद्यावर थेंब कुठून पडतात ते देखील बघण्याची त्याच्या शरीरात त्राण शिल्लक राहिलेला नव्हता.

सर्व शक्ती एकवटून त्याने आपली नजर वर केली. तशीच त्याच्या डोक्याच्यावर हवेत त्याला हडळ दिसली. व सदया ने वर बघताच जोराने हसत हसत किंचाळली.

” सदया………हा….हा….हा….हा…..”

समाप्त…!

  • लेखक – सागर राऊत

हे वाचलंत का? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment