marathi katha

happy-4672962_640

मराठी कथा

डेंजर झोन फ्रेंड अँड कंफोर्ट झोन फ्रेंड

सपकन कानाखाली बसताच, मी विचारचक्रातून बाहेर आलो.
“आम्ही सर्व येडे आहोत का इथे बसलो ते ?तुझं लक्ष कुठे आहे!”

चार ते पाच मित्रांच्या गोल तयार केलेल्या समूहाचा मी पण एक भाग होतो. त्या गोल रिंगणात दोन वेग वेगळ्या ब्रँडच्या ड्रिंक आणि प्लास्टिक चे काही ग्लास होते.

मी तेथे असून सुद्धा नसल्या सारखच होतो. म्हणूनच बहुतेक माझ्या कानाखाली नक्षी उमटली असावी.

बरेच वर्षा पासून त्याच्या चाललेल्या निरर्थक प्रयत्नाला मी कधी बळी पडणार नाही, हे त्यांना चांगलाच माहीत होतं. म्हणून का होईना, पण त्यांच्या पार्टीत ते नेहमी माझ्यासाठी एखादी सॉफ्टड्रिंक आणुनच ठेवायचे.

त्यांच्या त्या व्हिस्की ने भरलेल्या ग्लासान सामोर माझा ग्लास एक विचित्रच होता.

दिवाळीला घरून आणलेला फरसाण,चकल्या आणि शेव हा तर यांच्यासाठी चकना होता. यांच्यासाठीच काय तर पिणाऱ्या प्रत्येक व्यक्ती साठी हा तर राष्ट्रीय चकना म्हणून घोषितच झाला होता.

ग्लास मध्ये पाणी कमी टाक, जास्त टाक, ये……चकना कमी खा! अशी आरडा ओरड चालू झाली होती. या सर्व गोंधळाचा आत्ता काही शेवट नव्हता. कारण प्रत्येक पेग मध्ये यांचा हा आवाज वाढणार हे मला माहित होतेच.

म्हणून मी यांच्या सोबत कमीच राहायचो. परंतु त्यांच्या जबरदस्ती ला माझ्याकडे पर्याय नसायचा, म्हणून मी उगाच आपलं बसायचं सोबत म्हणून बसलेलो होतो.

मला या गोष्टीचा आणि यांचा नेहमी राग यायचा. परंतु साले जीव लावायचे माझ्यावर. म्हणून मधातून जरा उठून जरी गेलो, की शिव्यांचा वर्षाव माझ्यावर व्हायचा.

आत्ता यांचं चालू द्या. म्हणून मी परत विचारांच्या स्वाधीन झालो.

या वेळेला विचार कुठल्या मुलीचा किंवा करिअर चा नाही, तर याच नालायक मित्रांचा होता. कधी कधी वाटायचं अश्या मुलानं सोबत मी कशालाच राहतोय.

यांच्या पासून दूर जाऊन आपल्या दुसऱ्या मित्रांच्या टोळी मध्ये जायचं, की जे फक्त कामाशी काम ठेवतात. तसेच कुणाच्या लेण्यात न देण्यात अशी मित्र.

म्हणून माझ्या डोक्यात दोन झोन तयार झालेले होते.
एक तर कंफोर्ट झोन फ्रेंड आणि दुसरा डेंजर झोन फ्रेंड.

पार्ट्या करत लोळत बसणारी मंडळी ही माझ्या साठी डेंजर झोन फ्रेंड तर कामाशी काम ठेवणारी ही कंफोर्ट झोन फ्रेंड.
आणि या दोन्ही नाण्याची मी मधली बाजू ना छापा ना काटा.

अभ्यासा वरून उठवून नेणारी ही एक टोळी तर दुसरी अभ्यास करायला सोबत घेऊन बसणारी ही एक टोळी.

पेपर मध्ये फक्त दोन ते तीन प्रश्न सोडवून अख्या क्लास ला उत्तर दाखवणारी ही एक टोळी तर दुसरी
पेपर पूर्ण होऊन सुद्धा काही न मदत करणारी ही एक टोळी.

चहा नास्ता च्या बिलावरून भांडणारी ही एक टोळी तर दुसरी
चहा नास्ता चे आपापले बिल देणारी ही एक टोळी.

सुख दुःखात एकत्र येऊन मदत करणारी ही एक टोळी तर दुसरी साधा मदतीचा पण हात न देणारी ही एक टोळी.

मग का मला कंफोर्ट झोन वाले फ्रेंड आवडतात. यांच्या तुलनेत तर ते लय भारी.

क्लास रूम मधल्या पहिल्या बेंचवरून लास्ट बेंच वर मला ते कधी न्यायचे कळत नसायचे. नाईलाज असायचा कारण माझं एक बुक माझ्या पाशी, तर माझी अख्खी बॅग त्याच्या जवड असायची.

पेन, पेन्सिल, रबर तर हे नेहमी माझेच वापरायचे. पण काही असो लास्ट बेंच वरून ही दुनिया वेगळीच दिसायची.

स्वतःच्या वाढदिवसाला पण आपलं केक वर नाव नसायचं, कारण यांनी जोड्या लावून ठेवलेल्या मुलींची नावे त्या वर असायची. पूजा, पूनम, स्नेहा ही नावे तर दर वर्षीच बदलायची.

असाच एक प्रसंग डोळ्यांसमोर उभा झाला. त्या घटनेने तर माझ्या नजरेत ते खूप वर व मनात घर करून गेलेत.

काही वर्षपूर्वी………….

बऱ्याच प्रमाणात मला उलट्या झाल्यामुळे मला अशक्तपणा जाणवत होता. आजच्या जेवणामुळे मला काहीतरी झालं होतं. पाणी जरी पिलो तरी लगेचच उलटी व्हायची.

माझा हा चाललेला प्रकार पाहून अभ्यास करणारे माझे मित्र माझ्या जवड आले, व मला म्हणाले.

“अरे….काय झालं? तुला बर नाही का?”

मी बोलण्याच्या इच्छेत नसल्या कारणाने मी नकारार्थी मान हलवून उत्तर दिलं.

“तुमच्याकडे टॅबलेट असेल तर द्या!”मी त्यांना दबक्या स्वरात विचारले.

त्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं, थोडं थांबून त्यातला एक जण म्हणाला.
” तु थांब इथंच आम्ही जाऊन टॅबलेट घेऊन येतो.” अस म्हणून निघाले ते दोघे बाहेर.

त्या फ्लॅट वर आम्ही सहा मूल राहायचो. सोबत पण वेगळे दोन ग्रुप पडलेले. त्या ग्रुप मधले ते तीन मेंबर अजून पण बाहेर होतीच. बहुतेक गेली असतील कुठे पार्टी करायला.

मी स्वतःला सांभाडून फ्रेश हवा घ्यायला खिडकी समोर उभा राहून फ्लॅट खाली बघतच होतो. हे दोघे अजून पर्यंत टॅबलेट आणायला गेलेच नाही.

त्या दोघांच खाली काहीतरी संभाषण चालू होतं. आणि थोडा वेळ टाईमपास करून परत ते दोघे वर आली.
व मला बघताच म्हणाली.

“अरे यार सर्व मेडिकल बंद झालीत.”

त्यांना माझ्यापासून जे लपवायचे होते, ते मला आधीच कळलं होते. ते मेडिकल ला गेलेच नव्हते. पण मला काहीच नाही, कळले म्हणून मी सहज म्हणालो.

“राहू द्या रे….. इतकं काही मोठी गोष्ट नाही, मी बरा आहे.”

थोडाच वेळ लोटला असेल, माझं तापेने भाजत असलेलं शरीर अंथरुणावर निपचित पडलं होतं. डोळ्यासमोर अंधारी आणि तोंडातून न निघणार आवाज.

हे भरपूर प्रमाणात उलट्या केल्यामुळे झालं होतं. हातापायात काहीच त्राण शिल्लक राहिला नव्हता. माझ्याच बाजूला हे बसले असून सुद्धा यांना माझ्या थोडातून पाणी….पाणी….हे शब्द ऐकू येत नसावेत का?

या विचारात असताच, मी पाहिलं की हे दोघे पण रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये गेलेत. का तर माझा पाणी, पाणी या शब्दाचा आत्ता कणकणत्या आवाजात बदल झाला होता.

बरेचसे बाहेर गावाला राहणाऱ्या मुलांना आईची माया कमीच मिळते. त्यातला मी….., आज माझी आई माझ्या जवड असायला हवी असे मला वाटत होते.

मी जेवण केल्यानंतरच जेवण करणारी माझी आई…..आज तुला बघवल्या नाही जाणार अशी तुझ्या मुलाची अवस्था झाली आहे.

कधीच उपाशी न झोपू देणारी तू….आज तुझ्या मुलाला पाणी सुद्धा मिळत नाही आहे. माझ्याच अश्रूंनी माझं अंथरून भिजल होत. आणि डोळ्यांसमोर आत्ता फक्त अंधार… आणि अंधार शिल्लक होता.


कानावर माझ्या काही शब्द पडत होते.
“पळव…. पळव….अजून जोरात…..!”

मला कोणीतरी मागच्या बाजूने घट्ट धरून ठेवलं होतं.
मी मधात तर कोणीतरी बाईक चालवत होत.

माझी मान बाईक चालकाच्या खांद्यावर होती. आणि परत डोळ्यासमोर अंधार….


जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी स्वतःला हॉस्पिटल च्या बेड वर जाणवत होतो. बाजूला लावलेली सलाईन थेंब थेंब माझ्या शरीरात सरकत होती. आणि माझ्या बाजूला गोल करून डेंजर झोन मंडळी उभी होती. त्यांना बघताच मी लगेच विचारलं.

“मला काय झालं? मी इथं कसा…?”

“अरे काही नाही…! आत्ता सर्व ठीक आहे. तुला फूडपोईसोन झालं होतं. आणि तसेच तुझ्या पेशी पण कमी झाल्या होत्या.” त्यातल्या एकाने उत्तर दिलं.

माझ्या डोक्यात परत विचार चक्र चालू झालं.
“माझ्या घरी माहीत झाले असेल का? , माझे सेफ झोन मंडळी का नाही आलीत?” इत्यादी इत्यादी.


पाच दिवसांनी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज होऊन मी फ्लॅट वर आलो होतो. ठरल्या प्रमाणे कोणीही माझ्या घरी या बद्दल काहीही सांगितलेलं नव्हतं. उगाच कशाला घरचे काळजीत पडायचे म्हणून.

मला त्यांनी माझ्या रूम मध्ये आराम करायला लावला. न राहून मी त्यांना विचारल.
“काय झालं होतं त्या रात्री….. ? तुम्ही तर रूम वर नव्हते? मला तुम्ही कधी नेले हॉस्पिटल ला?

” अरे…..त्या रात्री आम्ही तिघेही मूवी बघून आलो होतो.
तर तुझी थोडी छेड काढावी म्हणून आम्ही तुझ्या रूम मध्ये आलो. तर तू झोपलेला आणि ते दोन नमुने हॉल मध्ये अभ्यास करत बसलेले होते.

मग आम्ही तर मस्तीच्या मूड मध्ये होतोच. आणि तू झोपलेला दिसताच, आम्ही तिघांनी पण तुझ्या अंगावर धडाधड उड्या मारल्या, पण तुझा काहीच रिस्पॉन्स नाही. नाही तु आमच्यावर रागावला, नाही आमच्यावर ओरडला.

आणि बघतो तर काय….तू तर तापेने चांगलाच फनफनत होतास. तुला तसाच उचलला आणि बाईक वर ठेवला. आणि डायरेक्ट हॉस्पिटल”

मी लगेच शॉक होऊन विचारलं. “आपण चौघे एकाच बाईक वर गेलो?

“नाही रे…..आपण तिघे गेलो. आणि हा झंडू बाईक मागे पळत पळत आला.”
या वाक्यांनी सर्व जण हसायला लागली.

आज पहिल्यांदा यांच्यासोबत मी भरपूर गप्पा मारल्या होत्या.
का कुणास ठाऊक आज वेळ कसा गेला कळलंच नाही.

नेहमी प्रमाणे मेस वाले दादा जेवणाचे डबे ठेऊन गेला.
“आज डबे चारच? आम्ही लोक सहा….? मी स्वतःलाच प्रश्न केला.

या तिघांन सोबत मी फर्स्ट टाईम जेवायला बसलो होतो. माझा मी एक डबा जेवतोय. दोन डबे ते दोघे रूम मध्ये जेवताय. आणि राहिलेल्या एका डब्यात हे तिघे का जेवताय.

न राहून मी विचारलं.
” का तुम्ही एका डब्यात तिघे जेवत आहात? डबे आज चारच का दिलेत?”

ते तिघे आधी एकमेकांकडे बघून हसलेत व म्हणाले.
“अरे आज भूक नाही आम्हाला. आम्ही बाहेरून खाऊन आलोय.”

पण हे असे तर कधीच करत नसायचे. इथे जेवण करून परत वाटल्यास तर ते बाहेर खायचे. असो याचे काही वेगळंच चालायचं.

काही वेळाने डबे वाले दादा परत डबे वापस घ्यायला आले तेव्हा मी त्यांना दिसताच विचारले.
“आत्ता तुझी तब्बेत कशी आहे…?

“ठीक आहे आत्ता.” मी पण औपचारिक उत्तर दिलं व काही प्रतिसदात्मक बोलायचं म्हणून मी विचारलं.

“दादा आज चारच डबे का…?

“आज नाही….पाच दिवसापासून मी चारच डबे देतोय.” दादा डबे उचलत म्हणाला.

“का पण काय झालं….?” मी पण लगेचच विचारलं.

“का पण काय झालं…?मी पण असच त्या तिघांना विचारलं.” दादांनी माझ्या प्रश्नाला प्रश्नांची जोड देत म्हणाले.

” मग काय म्हणाले तुम्हाला ते…?” मी चोकशी करत दादाला विचारलं.

दादा थोडे सल्लात्मक पद्धतीने मला म्हणाले.
“ते तुझे मित्र मनाने खूप चांगले आहे. असे मित्र ज्यांचं नशीब चांगलं असतना त्यांनाच मिळतात. त्यांना गमावू नकोस!”

“पण का नेमकं काय झालं ते सांगणार आहात का आधी ?” मी थोडं रागातच म्हणालो.

“त्यांनी तस मला सांगायला नको म्हणाले होते, पण असो तुला पण माहीती म्हणून सांगतोय. आणि हो त्यांना काही सांगू नकोस मी तुला सांगितले म्हणून !” परत कोड्यात दादा म्हणाले.

“बर नाही सांगणार…तुम्ही सांगा आधी काय झालं ते?

“तू हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतास ना. तर तुझ्या सलाईन, औषध, हॉस्पिटल चार्ज यासाठी पैसेकुठून आलेत ते माहीत आहे का तुला?”

“कुठून…..?” माझ्या तोंडून नकळत निघालेला त्या शब्दात दादाला आत्ता गांभीर्य जाणवल.

सत्याचा उलघडा करत दादानी एका श्वासात सांगून दिल.

“ते पाच दिवसा पासून तिघे एकाच डब्यात जेवत आहेत. आणि उरलेल्या डब्याच्या पैशात तुझी औषध……”

माझ्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंनी त्याच्या वाक्याला अर्ध्यातच विराम लावला होता. मला जे कळायचे ते कळले होते. माझ्या साठी ते स्वतःच पोट मारत होते. माझे अश्रू दादा कडून नक्कीच बघिवल्या नाही गेले असणार म्हणून ते पुढे बोलून निघून गेले.

“काळजी घे तुझी……आणि मित्रांची……!”

बऱ्याच वेळपासून डोळ्यात साठलेल्या अश्रूंचा आत्ता बांध फुटला होता. हळूच गालावरून रुळत जाणाऱ्या अश्रूंनी आपापली वाट धरली होती. आणि माझ्या नजरेला डबे वाल्या दादाची अस्पष्ट पाठमोरी जाणारी आकृती दिसत होती.

अचानक माझ्या मांडीवर हालचाल झाली, माझी एकदम तंद्री तुटली. यांची पार्टी बहुतेक झाली होती. कोण कुठे तर कोणी कुठे लोळत झोपी गेली होती.

मी एकटाच फक्त तेथे बसून होतो. आणि माझ्या मांडीवर एक जण डोकं ठेऊन झोपी गेलेला. माझे अश्रू त्याच्या गालावर पडल्यामुळेच का तर तो हलला.

मी हळूच त्याचा गाल पुसला .व माझ्या समोरील सॉफ्टड्रिंक चा ग्लास उचलून एकटाच बडबडलो.

“चर्स….. मित्रानो…..
तुम्ही थोडे नालायक असले तरी चालेल. पण तुम्ही माझे मित्र आहात माझे….
तुम्हाला मी आयुष्यात कधीच नाही विसरणार……….!!!

………..समाप्त………..


  • सागर राऊत
Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Marathi Story

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *