रेशमीना त्यांचा बस्ता ( मराठी कथा )

रेशमीना त्यांचा बस्ता

Marathi Katha

रामपुर नावाच्या गावात तात्या आणि बायडाबाई नावाचे जोडपं राहत होते. आपल्या छोट्या शेतात काबाडकष्ट करत. स्वभावाने गरीब,पटकन मदतीला धावून येणारे जोडपं, आपण भलं आपलं काम भलं यानुसार चालणारे,पण पोटी मुल नाही याची सतत खंत वाटत असे……

        रामपूरच्या जत्रेत एक दिड दोन वर्षांचा मुलगा हरवतो.. तो रडत बसलेला असतो. तेवढ्या गर्दीत बायडाबाईंना आई समजून घट्ट मिठी मारतो . त्यापण त्याला माया लावतात,प्रेमाने उचलून घेतात. चौकशी करतात पण कुणीच  त्याला आपला म्हणत नाही म्हणून घरी घेऊन जातात.  काळजीपूर्वक सांभाळ करतात.असं करत करत महिना होतो. 

         एकेदिवशी चौकशी करत करत त्या मुलाचे आईवडील तात्यांच्या घरी येतात . तिथं हरवलेला आपला मुलगा त्यांना सापडतो त्यांचा आनंद शब्दात न मांडणारा…..ओळख पटवून त्याला त्यांच्याकडे सुपूर्द करतात.

 तात्या आणि बायडाबाईंंचा पण त्यांच्यावर जीव जडतो. पण दुसऱ्याचं पोरं ,ज्याची त्याची अमानत ! ह्या विचाराने डोळे पुसत कामाला सुरुवात करत. 

           पोरगं जिव लावून गेलं ! लेकाची मायाच वेगळी! शंभर वेळा आभार मानत मुलगा त्याचे आईवडील परत आपआपल्या घरी निघून जातात. शहारात आलात की नक्की या ! त्यांचं शहरात कापडदूकान असतं. पत्ता, फोन नंबरची देवाणघेवाण होते…..

पण तात्या कधीच त्याचा वापर करत नाहीत. बायडाबाई पण त्याची फक्त आठवण करून गप्प बसायच्या……दिवस.महीने, वर्ष लोटतात…..

तो मुलगा  जत्रेत जेव्हा सापडतो त्यानंतर  बायडाबाईंना दिवस राहतात. मुलाच्या पायगुणामुळे दिवस राहिले यांचा खुप आनंद होतो.                      

यथावकाश त्यांना मुलगी होते.चंद्राच्या कोरीप्रमाणे लेक हळूहळू मोठी होते. कविता लग्नायोग्य होते पोटाला चिमटा काढून ,पै पै करुन लाडक्या लेकीच्या “कविताच्या” लग्नासाठी तिची हौस मौज सगळं सगळं करायचं म्हणून दोघं राबत होती….. 

               कविता मोठी व्हायला लागली तसतशी दोघांच्या मनाची उलघाल सुरू झाली….लेक दुसऱ्या घरची ठेव…. वेळ आली की तिची बोळवण करायची…. पोटचा गोळा लाडाकोडात वाढवून दुसऱ्याला देऊन टाकायचा हि जगराहटी आपण पण पाळायची ह्या विचाराने मन अस्वस्थ व्हायचे पण विचारांना मागं टाकून पुढे जायचं हा रोजचा दिनक्रम असणारे साधं सरळ विचार करणारं जोडपं……

    ‌ कविताच्या मामाच्या ओळखीतून कविताला छान स्थळं आलं… नाकी डोळी नीटस असणारी कविता श्रीरामला पसंत पडली.सुपारी फुटली,तारीख ठरली…. याद्या झाल्या,बस्ता बांधायची वेळ झाली.

     तात्या, बायडाबाई, श्रीराम त्याचे आईबाबा, अजून चार पाच जण असा लवाजमा शहरातल्या मोठ्या प्रसिद्ध दुकानात पोहचला .

नवऱ्यामुलाची खरेदी सुरू झाली  खाणाखुणा, नजरानजर ह्याचबरोबर रंग, कपड्यांचा पोत , सलवार, कुर्ता,सफारी , अश्या नानाविध प्रकारने पसंती करून खरेदी झाली. 

 व्याहीविहीणीची खरेदी जोरकस खरेदी करून झाली…..

कविताच्या साड्या खरेदी सुरू झाली. आवडलेली साडी नेसवल्यावर तिचं लक्ष श्रीरामकडे……. हळूच हि नको… हि घे असं ,  तो जणू सांगत होता हा रंग तुला छान दिसेल हा नको…..असं करत करत मोरपंखी पैठणी, जांभळ्या रंगाचाबनारसीशालू, गुलाबी घागरा,हळदीची पिवळी साडी, हिरव्यारंगाची खणाची साडी, अश्या सात आठ साड्या घेऊन झाल्या.  बायडाबाईंच लक्ष मात्र किंमतीच्या स्टिकर्स वर परत परत जात होतं . 

  लेकीच्या लग्नाचा बस्ता बांधताना बायडाबाईंना एक हिरवीगार मोठ्या काठाची साडी मनापासून आवडली होती त्या खरेदीला येताना मनात ती साठवून आल्या होत्या….. एकुलत्या एक मुलीच्या लग्नात तात्यांना सफारीत आणि त्यांना मोठ्या काठाची हिरवीगार साडी नेसलेली असा फोटो काढायचा असं मनोमन ठरवून त्या आल्या होत्या….

   लेकीच्या साड्या खरेदी झाल्यावर मनात योजलेला आकडा पार पुढं निघून गेला हे केव्हाच त्यांच्या लक्षात आलं….

हौसेला मोल नाही! त्यातल्या त्यात लेकीची हौसं  मग बोलायला नकोच !  आईबापाची माया असते कस्तुरीसारखी न दिसणारी पण सतत जाणवणारी असं काहीसं तात्या आणि बायडाबाईंच! 

पण लाडक्या लेकीच्या लग्नात तिच्या सर्व ईच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या मनाला मुरड घातली परत केंव्हातरी ही साडी घेवू अस मनात ठरवत बिल देण्यासाठी म्हणून काऊंटर वर दोघेही नवराबायको पोहोचले….

         ‌ सगळं सगळं व्यवस्थित पॅकिंग करून दिल्याबद्दल दुकानदारचे आभार मानत  बिलाचा आकडा बघितला….  तात्यांनी खिशातला रुमाल काढून घाम पुसत पैशाचे बंडल काढून मोजत असताना पाठीमागून एक मुलाने तात्यांचा हात धरला आणि बिलाचे पैसे द्यायचे नाही असं सांगितलं……. तात्या गडबडले नाही नाही म्हणू लागले…… तात्या आणि बायडाबाईं त्या मुलाला निरखून पाहत होते….. त्या मुलाच्या पाठीमागुन आवाज आला

  ” तात्या मुलाला सांभाळलेले पैसे पण सांगा….. 

मुलाच्या वडिलांना पाहताच तात्यांना ओळख पटली. त्यांनी तात्यांची गळाभेट घेतली. हा अतुल तुम्हाला सापडलेला मुलगा अशी ओळख करुन देत म्हणाले . 

          अतुलने ती मोठ्या काठाची हिरवीगार साडीची पिशवी बायडाबाईंच्या हातात देऊन त्यांना नमस्कार केला…… कृत्यकृत्य भावनेने डोळ्यात धारा कधी सुरू झाल्या ते कळलेच नाही…… 


लेखिका – ©सौ आरती राजाराम परिचारक
पंढरपूर


हे वाचलंत का? –

Share