माहेरी केलेली मदत, सासरी नाही पटत?

माहेरी केलेली मदत, सासरी नाही पटत?

marathi goshta

“नाना, तुम्ही काय बोलताय? मेघाने ऐकलं तर वाईट वाटेल तिला, हे चुकतंय तुमचं” प्रदीप वडिलांना समजावून सांगत होता.

   “का? मी घाबरतो का तिला?मेघाच्या आईला ऑपरेशनसाठी दोन लाख रुपये तुम्ही दिलेत हे चुकीचं नाही? त्यांनी त्यांची सोय नको करायला? असं मुलीकडून घेणं शोभत का तिच्या माहेरच्यांना? आणि तूही परवानगी दिलीस ” नाना तावातावाने बोलत होते आणि मेघा बेडरूममध्ये स्वतःला शांत करत होती.

      मेघा, स्वतः इंजिनिअर, ME झालेली, मोठ्या कम्पनीत चांगल्या हुद्द्यावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी असणारी पण माहेरची परिस्थिती बेताची. भाऊ स्वतःच्या पायावर उभा होता पण अचानक आलेल्या एवढ्या मोठ्या खर्चाची जबाबदारी उचलण्याएवढं त्याचं saving नव्हतं. आईचं ऑपरेशन अचानक समोर आल्यावर तिने आपणहून निम्मा खर्च उचलला त्यामुळे दादा वहिनीला हायसं वाटलं. तसं माहेरही स्वाभिमानी असल्याने त्यांनीही कधी मागितलं नव्हतं.

   वातावरण निवळल्यावर मेघा मनाशी काहीतरी ठरवून हॉलमध्ये आली. “आई, नाना मला बोलायचंय तुमच्याशी. मगाशी मी मुद्दाम बाहेर आले नाही कारण शब्दाने शब्द वाढवायचा नव्हता. मागे एकदाही याच कारणावरून तुम्ही चिडचिड केली होती त्यामुळे मी आता माझं मन मोकळं करणार आहे.”

    प्रदीपला मात्र टेन्शन आलं होतं आता भांडण होणार की काय? “माझे बाबा अत्यन्त गरीब घरण्यातून वर आलेले. पण आपल्यासारखं इतरांचं होऊ नये म्हणून त्यांनी खूप जणांना मदत केली त्यामुळे ते गेले तेव्हा त्यांच्याकडे फार शिल्लक नव्हती. पण परोपकाराच्या पुण्याची saving आणि गौरवाची प्रॉपर्टी होती जी आजही आहे. त्यांच्याकडे नसतानाही, ही मुलगी आहे, दुसऱ्याचं धन होणार असा विचार न करता त्यांनी मला शिकवलं, मोठं केलं आणि आज माझ्या नावाचा दबदबा आहे. तुमच्या भाषेत तुम्हाला कळेल असं बोलायचं तर पहिले म्हणजे त्यांनी माझ्यावर जो खर्च केला त्यापेक्षा मी त्यांना आता दिलेली रक्कम खूप कमी आहे.”

       “दुसरं असं, मी गेली बारा वर्षे नोकरी करते आहे. Average ५०,००० पगार पकडला तर वर्षाला सहा लाख म्हणजे एकूण ७२ लाख कमावलेत, त्यातले माझ्यासाठी स्वतःसाठी खर्च केलेले म्हणजे दागिने, कपडे क्वचितच एखादा सिनेमा वा हॉटेलमधील जेवण हे वजा करता कमीतकमी ६० लाख तर नक्कीच घरात दिलेत.

शिवाय बाईसारखे राबण्याचे, स्वयंपाकाचे महिना पाच हजार वाचवले म्हंटलं तर निदान सहा लाख असे एकूण ६६ लाख, माझ्या शिक्षणावर ज्यांनी एक रुपयाही खर्च केला नाही त्यांच्यावर मी खर्च केले. जर हा माझाच संसार असेल तर माहेरचीही माणसं माझीच आहेत एवढं लक्षात ठेवा.” मेघा ज्या शांतपणे गणितं मांडत होती नानांचा चेहरा पडत होता आणि प्रदीपला हसू येत होतं.

   “थांबा हं, अजून सम्पलं नाहीये. दोन प्रकारच्या मुली असतात. एक ज्या स्वावलंबी नसल्याने आयुष्यभर माहेरावर अवलंबून रहातात, बरेचवेळा स्वाभिमान गुंडाळून! आणि दुसऱ्या ज्या स्वतः स्वावलंबी होऊन माहेरचा अभिमान होतात. मी दुसऱ्या प्रकारातली आहे हे सांगायला नकोच. पहिल्या प्रकारातली कोण आहे हेही तुम्हाला माहित आहे !” असं म्हणताच प्रदीपला तर ठसकाच लागला आणि आई नानांचा चेहरा मुलीमुळे खाडकन उतरला.

    “नाना, तुम्हाला दुखावणे हा हेतू नक्कीच नाही. फक्त तुम्हाला समजेल अशा भाषेत समजावून सांगितलं. एका घरात आपण गुण्यागोविंदाने रहातो, एकमेकांना सांभाळून घेतो मग तसेच जर मी माझ्या माहेरी वागले तर का सलतं? मी शिक्षित, नोकरदार असून जेवढं सासरसाठी करते त्याच्या एक शतांश जरी माहेरसाठी, ज्यांनी मला घडवलंय त्यांच्यासाठी करू शकले तर तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे.

असं बोलू नये पण पहिलं आणि शेवटचं ठासून सांगते, मी गरजेला माझ्या माहेराच्या पाठीशी उभी रहाणारच! स्वतःचा संसार उघड्यावर टाकून परमार्थ करण्याएवढी मी महान नाही, ती अक्कल मलाही आहे. हे जर पटत नसेल तर माझ्या साठ लाखाचा हिशोब चुकता करा उद्याच्या उद्या मी दादाकडून पैसे परत मागते.” मेघाच्या अंगातली झाशीची राणी आज प्रदीपने प्रथमच पाहिली होती. मेघाच्या बोलण्याशी सहमत असल्याची पावती तो त्याच्या मौनातून देत होता.

चक्क सासूबाई म्हणाल्या, “खरंय पोरी तुझं. हे प्रत्येक लेकीने केलं पाहिजे. आम्ही चुकलो पण आता नव्या पिढीने चूक सुधारावी!”

          “आलं लक्षात “म्हणत नाना त्यांच्या खोलीत गेले.

           हे सगळं बघणाऱ्या आर्याच्या डोळ्यात आईविषयी अभिमान आणि भविष्यातील आत्मविश्वासाची चमक दिसत होती.

©️®️डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर


हे वाचलंत का? –

Leave a Comment