मव्हळयाची वाट

मव्हळयाची वाट (कथा)

marathi katha

संध्याकाळचे साडे सहा वाजले तरी आई अजून घरी आली नव्हती. सगळीकडे अंधार पडू लागला होता. मी व माझा लहान भाऊ एकमेकांना चिकटून दाराजवळ कित्येक वेळ बसून होतो. घराच्या उंबऱ्याला लागूनच कुडा-पत्र्याचा गोठा होता. पुढ्यातल्या वैरणीकडे आजीबात लक्ष्य न देता आमची म्हैस ‘टका-मका’ डोळ्यांनी दाराच्या दिशेने पाहत होती. काही दिवसांपूर्वी झालेलं तीच गोंडस रेडकू त्याच्या आईकडे पाहून कान हलवत होत. घरातून झाडू मारून. देवाला दिवा-बत्ती करून.

चुलीवर भात शिजवून. मी आई साठी चुलीवर अंघोळीला पाणी ठेवलं होत.नुकतीच दिवाळी होऊन गेली होती. गुलाबी थंडीने केंव्हाचीच हजेरी लावली होती. आई गावाला लागूनच असणाऱ्या खोपडदाऱ्याच्या डोंगरात गवत कापायला जात असे. वारंगुळे करून माणसं गाठीशी बांधून जवळपास हजारभर गवताच्या पेंड्याची गंज आई डोंगरात रचे व एकदा सगळ्यांचे वारंगुळे फिटले की आम्हा दोघा मुलांना घेऊन ती गवत उतरायला चालू करे.

गवत उतरणी म्हणजे महाकष्टाचं काम. भला मोठा डोंगर डोक्यावर पंधरा-वीस गवताच्या पेंडया. गूळगुळीत घसरगुंडी वाट. प्रत्येक पाउल संभाळून टाकावं लागत. पण मला हे सगळ करण्यात मजा वाटे. गेल्यावर्षी मी तर शर्थच केली होती.

जवळपास आठवडाभर मी आणी आई ने दिवसाच्या तीन – चार खेपा करत आठशे गवत डोंगर माथ्यावरून पायथ्याला उतरवलं होत. सगळ्यांनी माझं कौतुक केलं होत. पुढे आठवडाभर आई माझ्यावर खूप खुश होती. नंतर माझी ही विक्रमी गोष्ट जुनी होत गेल्यावर बऱ्याच दिवसांनी घरात पसारा झाला म्हणून शिव्या एकाव्या लागल्या होत्या.

आमच्या आईच असंच असत जर तुम्ही तिला काम करताना दिसलात तर ती तुमच्याशी हसत बोलणार आणि जर तुम्ही घरातल्या कामाला हात लावला नाहीत तर मग मात्र ‘बांबू, डोलीवाला, पालखीबसवली त्याची, वळू, रेडा अशी असंख्य स्तुतीसुमणे ती माझ्यावर व माझ्या भावावर उधळणारच.

‘दादा आई कधी येणार’…..जवळपास शंभर वेळा हा प्रश्न माझ्या भावाने मला विचारला होता. ‘येईल आत्ता’ एव्हडच उत्तर मी त्याला कधीपासून देत होतो. मला भीती वाटत होती की हा रडायला लागू नये म्हणजे झालं. गावाला लागुनच असणाऱ्या दिवेवाडीतल्या हिरू आज्जी बरोबर आई चा वारंगुळा होता.

सकाळी भल्या पहाटे घर सोडून डोंगारात जाणाऱ्या बायका संध्याकाळी दिवे लागणीला घरी यायच्या. जाण्याआगोदर घरातला सगळा स्वयंपाक तयार असे. आम्ही उठायचं. बिछाना काढायचा. दूध घालून यायचं. म्हशीला वैरण द्यायची. अंघोळ करायची. भाकरी-भाजीचा नाष्टा. तोपर्यंत दहा कधी वाजायचे कळायचं नाही मग मी आणि भाऊ एकमेकांचा हात पकडून शाळेत जायचो.

माझ्या पोटात भीती कळवळू लागली. आमच्या आजूबाजुच कुणीच आईच्या सोबत नव्हत कारण सगळ्यांची रान वेगवेगळी होती. बाहेरचा अंधार अधिक गडद होत चालला होता. ह्यावेळी आई घरात असायची. गरम पाण्याने अंघोळ करून ती म्हशीची धार काढायला बसायची. नंतर गरमा-गरम भाकरी थापून त्यावर लपतबी कालवण उलथपालथ करायची व मला व भावाला जेवायला वाढायची.

मी घरात आलो. लाईट नेहमीप्रमाणे आली नसल्याने मी रिकाम्या दारुच्या बाटली मध्ये रॉकेल घालून दिवे पेटवले. हे काम शाळेतून आल्यावर आई ने आठवणीने करायला सांगितल होत. चुलीपाशी एक व बाहेर गोठ्यात एक असे दिवे ठेवले. मारुतीच्या शेपटीप्रमाणे भाऊ माझ्या शर्ट धरून मागेच होता. त्याला अंधाराची फार भीती वाटते हे मी जाणून होतो.

रातकीडयांची कीर-कीर. म्हशीच उठण व धारेसाठी हिकडे-तिकडे नाचण तिच्या हंबरण्यात मिसळणारा तिच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज. आता मला सुद्धा कसंच तरी होत होत. खूप भीती वाटायला लागली होती.
‘दादा आई ’…भावाचे हळूच व्हिवळण्याचे शब्द कानावर आले. मी चरकलो. बाहेर अंगणात आलो. समोर पहिल. बाहेर सगळया काळोखाने मगरमिठीत घेतलेल्या डोंगराची रेघ राक्षसासारखी दिसत होती.
“चल आपण हिरू आज्जीच्या घरून जाऊन येऊ”… मी म्हणालो.
“आणि घरी”…?”

दाराला कुलूप लावून. पडवीच दार पुढे ढकलून आम्ही दिवेवाडीची अंधारी वाट कापू लागलो. भावाने डोळे मिटले होते. व माझा हात घट्ट पकडला होता. गावातली घरे मागे पडली. आम्ही डांबरी पुलावर आलो. इथे आम्ही दिवसाचे क्रिकेट खेळतो रात्री हिकडे यायला सगळे घाबरतात. इथूनच एक वाट मव्हळ्याच्या दिशेने म्हणजेच डोंगर पायथ्याच्या दिशेने गेली आहे.

गावातली सगळी गुर-ढोर ह्याच वाटेने येतात- जातात. खोपडदऱ्याला जायची सुद्धा हीच वाट. मी त्या काळ्याभिन्न वाटेकडे एकवार पाहिलं. कसलीच चाहूल नाही मिट्ट काळोख.
दिवेवाडी आणि गाव यांच्यामध्ये असणाऱ्या जुन्या वडाच्या भूताटकीचे किस्से मी खूप एकले होते. वडावर हडळ राहते तो वड आला. आता भावाप्रमाणे मी सुद्धा डोळे मिटून चालू लागलो. फक्त रस्त्याचा आधार धरून चालण्यासाठी हलकीशी पापणी वर करायची झालं. रस्ता उमगला की डोळे बंद. असे करत-करत आम्ही कशीतरी दिवेवाडी घाटली.

“आर पोरांनो तुमची आय तर कव्हाच गेली रानामधून…….”

“पण आजून कशी नाही आली ती”…मी.

“आर चुकामुक झाली असंल. उद्यापासन तुमची काढणी आहे ना म्हणून माणस बघाया गेली असंल …जा असंच घरला… यंधाळा पोचली असंल घरी…घाबरू नका निट काट्या कुट्यातन जा…इचू बिचू बघून जा…”

“आम्हाला खूप भीती वाटते… महेश दादाला सांगा ना आम्हाला वडाच्या खाली सोडायला”….भाऊ म्हणाला. दिव्याच्या उजेडात अभ्यास करत असलेला महेश दादा आतून “तिकड आय घालू देत मी नाही जाणार “ म्हणून मोकळा झाला.

मी भावाच्या हाताला घट्ट पकडलं व चालू लागलो. हिरू आज्जी काहीतरी मागून बोलत होती. पण माझं त्याकडे आजीबात लक्ष्य नव्हत. मला प्रचंड राग आला होता. आई ला कधी एकदा झाला प्रकार सांगतोय असं झालं होत. रागाच्या भरात मी कधी वडाच झाड पार केला समजलंच नाही. घरी आलो. बघतो तर पडवीच दार आम्ही लावून गेलो तसंच होत.

याचा अर्थ स्पष्ट होता की आई अजून आली नाही. आता तर मी पूर्णपणे रडकुंडीला आलो. पण रडून चालणार नव्हत. मी रडलो तर भाऊ सुरुवात करणार म्हणून शांतच बसलो.
“चल”…मी म्हणालो.
“कुठे”…भाऊ म्हणाला.
“आई ला शोधायला डोंगरात”
“आपण दोघच दादा… भूत आली तर”…

“तू येतोयस का जाऊ मी ? ”….माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याइतपत मी त्याला वेळ सुद्धा दिला नाही. सरळ चालू लागलो. मागून येउन माझा हात धरत तो सुद्धा चालू लागला. आम्ही पुन्हा पुलापाशी आलो. मघाशी मव्हळ्याच्या दिशेने जाणारी काळी भिन्न वाट पहिली होती आहे तशीच ती आमच्याकडे टकमक पाहत होती. क्षणभर थांबलो आवंढा गिळला. भावाचा हात घट्ट पकडला व विहिरीत जशी धाब्यावरून डोळे मिटून उडी घेतात तस त्या अंधारत अंग ढकलून दिल.

सगळा हागणदरीचा वास अवती भवती पसरला होता. पायातले सँडल खड्यांवरून घसरत होते. एखादा दगड पायाला ठेचकाळत होता. अंधारातून चालायला लागल्यावर पायांना हळू-हळू सवय झाली. आता समोरच थोडसं का होईना दिसू लागल होत.

कुणी काही बोलत नव्हत. ही वाट म्हणजे पावसाळ्यात वाहणारा ओढाच. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वावरांच्या ताली व त्यावर वाढलेली झाडं-झुडप. मधूनच सरपट आवाज येई, कुठे तरी खुसफूस वाजे. आणी आमच्या दोघांच्या छात्या जोराने धडधडायला लागत. पटापटा पाय उचलत आम्ही मव्हळ्यात पोचलो. इथे सगळ्या रस्त्याच्या बाजूला आंबा, करंज, लिंब यांची मोठ मोठी झाड होती.

अंधारत ती एव्हडी मोठी भयानक वाटत होती की रामायणातला कुणी दैत्य समोर बसला आहे. मला खोपडदऱ्याची वाट माहित असल्याने मी त्या दिशेने चालू लागलो. मोठ्याने
‘आई ….आई ….कुठ आहेस तू” ….अश्या हाका मारू लागलो. माझ्या ह्या सादेने भावाला तेव्हडच पाहिजे होत. माझ्यापेक्षा अधिक अधिरतेने बेंबीच्या देठापासून तो ओरडत होता. कसलाच प्रतिसाद नाही. आम्ही आमच्या हाका घालत पुढेच चालू लागलो. खोपडदऱ्याच्या डोंगराच्या पायथ्याला एक लिंब आहे तिथपर्यंत जायचं असं मी मनोमन ठरवल होत.

चढ उतार पार करत आम्ही लिंबापाशी पोचलो बारका भाऊ आणि मी जोर-जोरात ‘आईssss—आईssss’ म्हणून हाका मारू लागलो. कुठूनही कसलीच हाक येईना मला पप्पांची खूप आठवण यायला लागली. ते मुंबईला कामाला नसते आमच्या सोबत इथेच राहत असते तर बर झाल असत असं वाटू लागलं.

‘दादा चल अजून पूढ जाऊया’ रडक्या स्वरात भाऊ म्हणाला. मला थोडा धीर आला. आम्ही पटापट पुढे पाय उचलले. आणि अचानक गडबडीने पुढे जायच्या नादात भावाचा पकडलेला हात कधी सुटला समजल नाही. मागून त्याचा रडण्याचा आवाज एकला व मी समजून गेलो तसाच मागे पळालो. त्याच्या अंघठ्याला जोरदार ठेस लागली होती. रक्त वाहत होत.

डोळ्यातील पाण्याच्या धारा थांबायच नाव घेईनात मला तर काय कराव सुचेना
‘आईssss….आईssss ….कुठेस तू…’ एकच गजर त्याने चालू केला. त्याच व्हीव्हळण खडकालाही पाझर फोडेल असं होत. मला खूप दया येत होती. पण त्याला ह्या स्थितीत आवरण फक्त आईलाच जमत.
“आई कुठेस तू….मला लागलंय”…भाऊ.

“ सागर…प्रतिक…आले हा बाळांनो”….अचानक हा आवाज एकू आला आणी भावाच रडन जागेवरच थांबल. सगळ स्तब्ध. अंधारात डोळ्यांना अधिक ताण देत आम्ही पाहू लागलो. डोक्यावर गवताच्या पेंड्याच ओझ घेतलेली आईच आमच्या समोर, तीने तिच्या डोक्यावरच ओझ खाली टाकल. आमच्या दोघांना छातीशी कवटाळून आधाश्यासारखे आमचे पापे घेतले. आम्ही तीघही रडत होतो. लहानगया प्रतिकच्या पायाचा अंघटा पाहून तर तिचे हात थरथरायला लागले. तिने कापडाच्या चिंधीत अंधारात चाचपडत कुर्मुडीचा पाला ओरबडला. व हातावर घासून तिने प्रतिकच्या अंघटयावर ठेवला. चिंधी बांधली.

“आई कुठे होतीस तू आम्ही किती शोधलं तुला”….मी म्हणालो. त्यावर काही उत्तर न देता तिने माझ्या गालावर हात ठेवले. गवताच ओझ तसच तिथे टाकून तिने प्रतिकला पाठीवर घेतलं. व आम्ही घरची वाट चालू लागलो. कुणी काही बोलल नाही. घरी पोचलो तेंव्हा बहुतेक आठ वाजले होते. परडयात म्हशीने नाचून धिंगाणा घातला होता. आईची चाहूल लागताच तिने मोठ्याने हंबरायला सुरुवात केली. मी घमेल्याखाली ठेवलेली चावी काढली. दार उघडल.

आईने प्रतिकला खाटेवर झोपवून मला त्याच्या शेजारी बसायला सांगीतलं. चूल पेटवली. पाणी तापत ठेवलं. घमेल्यात दोन भांडी रतीब घातला व म्हशीच्या पुढ्यात ठेवून धार काढली. गोठा स्वच्छ केला. भाकरी थापल्या. बोंबलाची लपतबी चटणी केली. आणि मला व भावाला जेवायला उठवले. प्रतीकच्या पायाला लागल असल्या कारणाने त्याला भरवावं लागत होत.

पोटभर जेवलो मग अंथरुण टाकून तिने आम्हाला निजवलं. आणि एकाएकी पाउस पडू लागला. घराच्या कौलांवर दगडी टाकल्यासारख्या धारा कोसळू लागल्या. विजा चमकू लागल्या. भाऊ केंव्हाचा झोपी गेला होता. मी जागाच होतो. आई आमच्या दोघांच्याही डोक्यावरून हात फिरवत होती. रडत होती. दिवे कधीच घालवले होते. वीजांच्या लखलखाटात दिसणारा आईचा तो रडणारा चेहरा डोळ्यात साठवत मी तिला घट्ट बिलगून झोपी गेलो.
सकाळी भल्या पहाटे हिरूआज्जी घरी आली.

“आग कुठ हुतीस बया…. रातभर जीवाला घोर नाही”….तिच्या भल्या मोठ्या आवाजाने मला जाग आली पण मी झोपलो आहे असंच दाखवलं,
आलेला हुंदका दाबत आई म्हणाली.

“आत्या आव्ह काय सांगायचं…तुमच्या पासन निघून थेट रानात आले. आणि व्हइल तेव्हड गवत काढून घ्यावं म्हणाले….पण कशाच काय कामच्या नादात अंधार कधी पडला समजलच नाही. वझ बांधल, आणि चढाला उभ करून खाली खालून उचललं तसा त्याच्या झोक्यासरशी तोल गेला आणि पाय घसरला.

गचपान होत म्हणून बर नाहीतर कड्यावरूनच खाली आले असते, डोळ्यावर अंधारी. काही उमगणा. जाग आली तव्हा गडद अंधार पडला होता. वझ उचललं आणि चालू लागले. खाली मव्हळ्याच्या वाटलं आले तर दोन्हीबी पोर आत्या ‘आइ ….आइ’ करत वरडत होती”…..आई रडू लागली. हिरू आज्जीने तिचे डोळे पुसले डोक्यावरून हात फिरवला.

“नको रडू …..लय गुनाच लेक आहेत बाय तुझ”

“रातीच माझ्या घरी आल्यात…आज्जे आय कुठय आमची…म्हणाले बाबा उद्या रान काढायच लेका गेली असंल मानस सांगायला चुकामुक झाली असल जा घरी…गप निघाली….जेवल्यात का खाल्लय काय बी इचारल नाही बघ मी….तशी रात यरीची वाट तुडवत निघाली बघ … आमच्या मह्याला भाड्याला सांगीतलं पोरांना वडाच्या खाली सोडून ये तर नाही गेला भाडखाव …बापावानीच गांड वर करून पडला….”

हिरू आज्जीच्या बोलण्याने आई ज्यास्तच रडायला लागली. आमच्या दोघांच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. तिचे हुंदके मला स्पष्ट एकू येत होते. मी हळूच पापणी उचकटून आईचा चेहरा पहिला. ती आमच्याकडेच पाहत होती. तिच्या दोन्ही डोळ्यात आमच्या दोघांची प्रतिबिंबे उमटली होती. मी अर्धवट उघड्या डोळ्यांनी कितीतरी वेळ ते दृष्य पाहत होतो.

अक्षय राजेश कुसगांवकर


हे वाचलंत का? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Marathi Story

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *