काळचक्र (मराठी भयकथा)

marathi katha / marathi story

kalchakra-marathi-horror-stories

marathi horror stories

काळचक्र…

“ड्राइवर तुम्हाला किती वेळा सांगायचं की गाडी काढा उशीर होतोय म्हणून. मला आत्ताच्या आता शहादतपुरला जायचय, एकदा सांगितलेले कळत नाही का??” सारंग खेकसाऊन जोशींकाकांवर ओरडला.

“साहेब पण उद्या पहाटेच मला मोठ्या साहेबांना घेऊन एका कार्यक्रमासाठी निघायचंआहे ” जोशीकाका विनम्रपणे म्हणाले

हे ऐकून सारंग अजूनच संतापला
” म्हणजे तुम्ही मला नाही म्हणताय…मला?? मुकाट्याने मला शहादतपुरला सोडा आणि संध्याकाळ पर्यंत परत या! “

“पण साहेब….. शहादतपुर म्हणजे 5 तासांचा रास्ता आणि परत येणे म्हणजे 10 तास प्रवास ” जोशीकाका अडखळत हळू आवाजात म्हणाले.

” तुम्हा लोकांना आम्ही पगार कसला देतो याच भान असू दया जरा …ड्राइवर आहात, तुमचं कामच ते आहे” सारंग ओरडला.

सारंग जहागीरदार पुण्यातल्या श्रीमंत व्यापाराचा मुलगा आणि शहादतपुरच्या सावकारांचा एकमेव लाडका भाचा.

जोशीकाका हे त्यांच्या घरचे ड्राइवर, वयाने सारंगच्या वडिलांच्या बरोबर असतील…पण तरिही सारंग मात्र त्यांना ‘ड्राइवर’ तर कधी कधी तर ‘अरे’ ‘तुरे’ सारख्या भाषेतही बोलायचा. स्वतःच्या संपत्तीचा की अजून कशाचा अहंकार कुणास ठाऊक.

जोशीकाका मुकाट्याने खाली मान घालून गाडी घेऊन आलेत आणि सारंग ला घेऊन निघाले…..

प्रवास 5 तासांचा होता सारंग मागच्या सीटवर बसून बराच वेळ आपल्या मोबाईल वर टाईमपास करत होता आणि मग बोअर होऊन खिडकीतुन एकटक बाहेर बघत बसला.

पुणे सोडून जवळपास 2 तास झाले असतील, आता रस्ता अगदी निर्जन झाला होता , डोंगराळ भागातून आता नागमोळी वळण घेत गाडी वेगाने पुढे जात होती.

मध्ये मध्ये लहान लहान गावं, शेतात काम करणारे शेतकरी , मध्येच असणारे एखादे मंदिर हे सारंग अगदी विचारशुन्य असल्यासारखा एकटक बघत होता.

पण जशी जशी गाडी शहादतपुर कडे जात होती सारंगला एकाकी अस्वस्थ वाटायला सुरू झालं. दोन वर्षांपूर्वीची शहाडातपुरची घटना अजूनही त्याच्या मनात मूळ धरून बसली होती.

गेली दोन वर्षे ज्या गोष्टीचा त्याच्यावर जराही परिणाम नाही झाला असा मानणारा आणि ती गोष्ट आपण विसरलो असे स्वतःला समजवणाऱ्या सारंगच्या मनाचा ती घटना वेगाने पाठलाग करु लागली.

माणूस कितीही निर्दयी असला तरीही त्याच्या मनाची एक बाजू त्याला त्याच्या कर्माबद्दल सतत कोसत असते.

सारंग ने ड्राइवरला गाडी रोडच्या साईड ला घ्यायला लावली
आणि तो गाडीला पाठ टेकवून उभे राहत सिगारेट ओढत दूरवर पसरलेल्या शेतांकडे पाहून कसल्यातरी विचारात एकमग्न होऊन बघू लागला.

अचानक हाताला सिगारेट चा चटका लागला आणि त्याचं ध्यान तुटलं.
जोशीकाका म्हणजेच ड्रायव्हर यांना सारंगची बेचैनी स्पष्ट दिसत हाती तरीही ते त्याच्या रागीट स्वभावामुळे काहीच बोलत नव्हते.

सारंग गाडीत बसला आणि ते प्रवास पुन्हा सुरू झाला.
सारंग ने गाडीचा काच थोडा खाली केला आणि सीटवर डोके ठेवून डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागला.

अर्ध उघड्या खिडकीतून चेहऱ्यावर येणारी वाऱ्याची झुळूक सारंगच्या मनाची पाने मागे उलटत होती. गाडी जशी जशी पुढे जात होती सारंगच मन तस तस मागे भूतकाळात पळत होत.

शहादतपुर ! पुण्यापासून जवळ जवळ 300 किलोमीटर अंतरावर बसलेलं शे-दोनशे घर असलेलं गाव. गावचा मुख्य व्यवसाय शेती.

गावचे सरपंच आणि सावकार म्हणजेच विसाजीराव इनामदार.
हे सारंगचे मामा. सारंगच अधिकतर बालपण शहादतपुरमधेच गेलेलं. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये तिथेच राहायचा त्यामुळे हे जणू त्याला स्वतःचं गाव असल्यासारख वाटायचं.

गावातील बरीच टवाळखोर मित्र मंडळीचा सारंग बॉस झाला होता.
गावातील लहानांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळेच त्याला सारंगदादा म्हणून हाक मारत.

खरतर बरेच लोकांना हे खटकायचंही पण सावकाराचा एकमेव लाडका भाचा म्हटल्यावर सगळे त्याला खोटा भाव देत असत. उगाच याच्याशी वैरी म्हणजेच सावकाराशी वैरी अस लोक मानत असत.

गावातील मुलांना घेऊन bullet नि फिरणे, कुणाच्याही शेतात जाऊन त्याच्यावरच अरेरावी करणे, शहरातून दारू आणून गावात मुलांना पाजणे हे प्रकार सारंगचे सुरू राहत.
गावात सारंगच असण म्हणजे गावकऱ्यांसाठी डोकेदुखी असे.

सारंग गावात कुणालाही घाबरत नसला तरीही तो त्याचे मामा म्हणजेच सावकारांना मात्र घाबरत असे.
त्याच्या कुठलाही गोष्टीची खबर सावकाराकडे जाऊ नये याची तो पुरेपूर काळजी घेई.

गावात सारंगचा एक बालपणापासूचा जिगरी दोस्त होता तो म्हणजे विश्या. दोघंही दिवसभर बुलेट वर गावात जोरजोरात आवाज करत फिरत. आणि संध्याकाळी दारू आणि सिगारेट ची मैफिल बसवत.

एकदा त्या दोघांची तक्रार कुणीतरी गुप्तपणे सावकारांकडे केली .
सावकाराने तडखपणे सारंग ला बजावून सुनावले की या पुढे जर तो दारू पिताना सापडला तर त्याचे तंगडे तोडून गळ्यात बांधणार.

काही दिवस सारंग फार शांत झाला होता. मामालाही त्यावर दया आली होती.
पण सारंगला दारुशिवाय राहवत नव्हतं. त्याने लगेच विश्याला फोन लावला. ” विश्या आज बसूयात दारू घेऊन”

“पण कुठे??”

” कुठे म्हणजे काय ?? तुझ्या घरी “

“ते आता शक्य नाही. बा ने संमदयाना बजावून ठेवलाया इथं”
आता आपल्याला गावात कुठं बी बसता येणार न्हाई आणि पुन्हा अजून तुज्या मामाला कुणी सांगितलं तर तुज्यासंग मला बी गावातून काढून देतील” विश्या म्हणाला

” हम्म” विश्याला सहमती दाखवत सारंग म्हणाला.

” एक काम कर विश्या वेशीवर भेट, काहीतरी उपाय काढू”

“बर येतो”

अर्ध्या तासानंतर सारंग आणि विश्या दोघं गावाच्या वेशी जवळ उभे होते आणि विचार करत होते की दारू पिण्यासाठी कुठे बसायच म्हणून.

“मला एक जागा माहिती आहे जिथे आपल्याला कुणी बघणार नाही” विश्या म्हणाला

“कुठली??” सारंग उत्साहित होऊन म्हणाला

“हायवेजवळचा पूल!!”

हायवेपासून गावात जाण्यासाठी अतिशय निर्जन असा 4 किलोमीटर चा कच्चा डांबरी रस्ता होता. दिवसा कधी कधी या रस्त्यावरून गावात ये-जा सुरू राहायची ती पण फार तुरळक पण, रात्री मात्र क्वचितच कुणी फिरकायच.

हायवेवरून गावाकडे वळताच रस्त्यावर एक जुना पडका लहानसा पुल होता आणि याच पुलावर आपला दारूचा अड्डा करायचा निर्णय सारंग आणि विश्या ने घेतला.

” हे जागा मस्त आहे पण जर यदाकदाचित कुणी इकडे रात्री फिरकले तर आणि आपण पकडले गेलो तर??” विश्याने संभाव्य चिंता व्यक्त केली

“”हम्म”” सारंग विचार करू लाग

“आयडिया!!!!” सारंग उत्साहून ओरडला

“गावात अशी अफवा पसरवायची की रात्री हायवेजवळच्या पुलाजवळ काही भुतं आढळली म्हणून आणि ते येणाऱ्या जाणाऱ्या कुणालाही जिवंत सोडत नाहीत तो मनुष्य असो की प्राणी.

आणि हे काम तुला करायचं आहे विश्या” सारंग म्हणाला

” हे सगळं ठीक आहे पण गाववाले एवढे पण मूर्ख नाहीत की ते यावर विश्वास ठेवतील ते म्हणतील भूत आहेत तर ते आजपर्यंत का नाही दिसलीत कुणालाबी??” विश्या म्हणाला

” त्याचा विचार मी केला आहे तू फक्त तुझं काम कर.
माझ्या plan नुसार गावातले लोक नक्की विश्वास ठेवतील” सारंग म्हणाला

दुसऱ्या दिवशी म्हणता म्हणता सगळ्या गावात एक स्टोरी पसरली होती की हायवेजवळच्या पुलावर आजकाल एका स्त्रीची शापित आत्मा आली आहे.

गावात बऱ्याच लोकांना विश्वास बसेना पण
एक दिवस संध्याकाळी गावातील सखाराम जोरात ओरडत आणि धापा टाकत धावत आला आणि जोरजोरात ओरडू लागला.

सगळे लोक गोळा झाले, सारंग आणि विश्या पण धावत आले. काय झालं म्हणून सगळे विचारु लागलेत. सखाराम जोरात धापा टाकत होता त्याला बोलता सुध्दा येत नव्हतं.

सारंगने पुढे जाऊन त्याला पाणी दिल आहे काय झाले विचारु लागला…..

सखाराम सांगू लागला ….तो जे सांगत होता ते ऐकून प्रत्येक गावकरी स्तब्ध झाला आणि एक भयाण शांतता तिथं पसरली.

गावातले काही लोक लगेच धावत पुलकडे निघाले आणि ते जेंव्हा पुलाजवळ पोहचले तेंव्हा तिथले चित्र पाहून सगळयांना धक्काच बसला पुलाजवळच्या शेतात रात्रीला काम करणारा वृद्ध झिमा सोकाऱ्याचे छिन्नविच्छिन्न प्रेत झाडाला उलटे टांगलेले होते.

सगळा गाव हादरून गेला…पोलीस चौकशी झाली पण कुठलाही पुरावा हाती लागला नाही.

आता मात्र गाववाल्यांना पूर्ण विश्वास बसला होता की पुलाजवळ ती भयाण आत्मा आहे म्हणून.

सगळं गाव सुन्न झाल होत पण एक व्यक्ती मनातून खूष होता आणि तो म्हणजे …..सारंग.
‘हे गाववाले किती भित्रे आणि मूर्ख असतात ना’ असा विचार करत तो मनोमनी हसत होता.

हा सगळा सारंगचाच प्लान होता आणि तो खून….???
तो देखील सारंगनेच केला होता.

जेंव्हा तो हे सगळं करत होता तेव्हा विश्या सारंग ला म्हणत होता
” आपण झिमा सोकाऱ्याला मारणे गरजेचे होते काय??”

तेंव्हा सारंग रागाने एकटक विश्या च्या डोळ्यात बघून म्हणाला
” आपल्याला जर इथे त्याने बघितले असते तर जो हाल आपण त्याचा केला तोच हाल माझ्या मामाने आपला केला असता मुर्खा.

आणि गाववाल्यांना विश्वास देण्यासाठी हा एक खून आवश्यक होता आता बघ इकडे रात्री कुत्रापण फिरकणार नाही आणि आता ही जागा आपल्या दारू अड्ड्यासाठी कायमची सुरक्षित झाली”
“याला म्हणतात प्लांनिंग …….साप मरा और लाठी भी ना टुटी” एवढे बोलून सारंग जोरजोरात हसू लागला.

विश्या दोन क्षण त्याला एकटक बघत राहिला.. आपण जे काही केलं ते चुकीचं की बरोबर हे त्याला कळत नव्हतं,
पण ही जागा आता आपल्याला दारू प्यायला कायमची मोकळी झाली अशी स्वतःचीच समजूत घालून तो पण हळू हळू हसायला लागला.

दिवसांमागून दिवस जात होते सारंग आणि विश्या रोज रात्री पुलाजवळ दारूच्या नशेत धुंद असत..गावकरी भुताच्या भीतीमुळे चुकूनही रात्री तिकडे जात नसत.

एके रात्री नेहमीप्रमाणे सारंग आणि विश्या पुलावर दारू पीत बसले होते. भयाण शांततेत रातकिड्यां शिवाय त्या दोघांचाच आवाज घुमत होता.

दोघेही नशेत धुंद होते आणि गावकरी किती मूर्ख आणि भित्रे आहेत या विषयावरून जोरजोरात हसत होते.

मधेच दारूची एक संपलेली बाटली विश्या ने समोरच्या झाडावर फेकून मारली आणि अचानक जोरात आवाज झाला. ते पाहून सारंग म्हणाला

” कमाल आहे विश्या तुझी, बाटली एवढीशी पण आवाज बॉम्ब पडल्यासारखा…..वा!!!”

दोघेही पुन्हा जोरजोरात हसू लागले.

हसता हसता मधेच थांबून सारंग म्हणाला ” ए साल्या विश्या तू लहान बाळाच्या आवाजात का रडतोस हं??”

नशेत धुंद असलेला विश्या भारी डोळे भुवया उंच करून उघळण्याचा प्रयत्न करू लागला आणि म्हणाला

” मी कश्याला रडतोय??”

थोड्या वेळाने सारंग पुन्हा म्हणाला ” विश्या तू मला घाबरट समजलास काय रे ?? आता हे बाई च्या आवाजात ओरडून तुला वाटलं हा सारंग जहागीरदार घाबरणार??”

सारंग अस का म्हणतोय हे विचारणार तोच विश्याला देखील आता एक आवाज ऐकू यायला लागला…..

विश्या थोड्या भानावर येत येणारा आवाज ऐकणायचा प्रयत्न करू लागला .

आवाज ऐकून तो थबकला आणि त्याने इकडे तिकडे बघितले…

शूउउउउह!!!!!!

घाबरून हळूच सारंगच्या कानापाशी जाऊन म्हणाला…

” तुला हा आवाज ऐकायला येत आहे काय??
“हा आवाज नक्की कुठून येतोय??”

सारंग विश्याची हालचाल बागून सावध झाला.
आणि आवाज विश्या काढत नव्हता हे त्या कळल्यावर एकदम सावध होऊन दोघेही आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागले

सगळीकडे भयाण शांतता होती
हळुवार वाहणारा वारा, रातकिडे आणि वाऱ्यामुळे हलणाऱ्या झाडाच्या पांनाशिवाय कुठलाही आवाज आवाज त्यांना येत नव्हता.

आलेल्या आवाज भास होता असे समजून दोघांनी निश्वास टाकला आणि पुन्हा ग्लास भरू लागले.

तर अचानक त्या भयाण शांततेला कापत तो आवाज पुन्हा त्या दोघांच्या कानावर पडला आणि ते दोघेही स्तब्ध झाले..

कारण तो आवाज एक लहान मुलाच्या रडण्याचा होता आणि त्यांना अगदी स्पष्टपणे आणि त्यांच्यापासून खूप जवळ असलेल्या झुडपातून येऊ लागला.

दोघेही झटपटी ने उभे झाले आणि एकटक त्या झुडुपाकडे बघू लागले आणि नंतर एकमेकांकडे बघू लागले. विश्या ने सारंग ला इथून लवकर पळून जाउया हे ईशाऱ्याने सांगितले.

दिघेही लगबगीने bike वर बसले आणि bike सुरू करताच हेडलाईट च्या उजेळात जे दृष्य त्यांना दिसले ते पाहून दोघांच्या पायाखालची जमीन सरकली…

समोर एक रक्तबंबाळ स्त्री उभी होती आणि ती दोन्ही हातांनी त्याच्याकडे बघून काहीतरी इशारा करत होती.

सारंगच्या अंगाच पाणी पाणी झालं होतं
विश्या च्या तोंडातुन तर एक शब्द ही फुटत नव्हता.

ती एक एक पाऊल पुढे पुढे टाकत येत होती.
सारंग चे हात पाय काम करत नव्हते.

तो कसा तरी bike turn करण्याचा प्रयत्न करू लागला तोच बाळाच्या रडण्याचा आवाज वाढला तसाच त्या स्त्री चा वेगही वाढला.

विश्या अचानक जोरजोरात ओरडायला लागला
“राम राम राम राम राम !!!!’ देवाला प्रार्थना करू लागला.

ज्या दोघांना आजपर्यंत या जागी एकांत पाहिजे होता आता या क्षणाला इथे कुणी तरी पाहिजे होत असे वाटू लागलं. दोघेही जिवाच्या आकांताने तिथून पाळण्याचा प्रयत्न करू लागले .

अचानक त्या दोघांच्या आवाजात एक तिसरा आवाज घुमू लागला हा आवाज त्या स्त्री चा होता. विश्या आणि सारंग ला हा आपल्या जीवनाचा शेवटचा क्षण आहे असे वाटू लागले.

झुडुपातुन येणाच्या बाळाचा आवाज वाढला.
आता ती स्त्री अधिकच जवळ पोहचली सारंगला आता तिला ओलांडल्याशिवाय bike turn करणे शक्य नव्हते.

सारंगने bike जवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या दगडाकडे इशारा करत विश्याला धक्का दिला.

विश्याने एक सेकंदही न चुकवता तो दगड उचलून त्या स्त्री च्या डोक्यात हाणला आणि गाडी वर बसून दोघेही गावाच्या दिशेने वेगात पोबारा झाले.

पुलाजवळ झालेली ही घटना खरी की भास,सारंगला काहीच कळतं नव्हते तो भांबावून गेला होता.
आपण गावात पसरवलेली भुताची अफवा खरी तर नसेल ना ?हा विचार त्या दोघांच्या मनात घर करून गेला.

रात्री सारंगला झोप लागत नव्हती. सारखा तोच विचार त्याच्या मनात चालू होता ती की हे कसं शक्य आहे……अजूनही त्याच अंग थरथरत होत…..

पहाट होता होता त्याचा डोळा लागला,
तोच…घरी कुणीतरी ओरडत आल “सरपंच…. ओ…सरपंच ” “गावाबाहेर बघा काय झालं.

तर.”….त्या आवाजाने सारंग घाबरून ताडकन उठला, त्याचे डोकं फार जड झालं होत, काल रात्री काय झालं हे त्या समजायला दोन क्षण लागले…

सगळ्या गावात धुमाकुळ माजला होता. लोक गाड्या घेऊन पुलाकडे जात होते.
सारंग घरातच झोपेचं सोंग घेऊन थांबला होता….

तास-एकभऱ्याने गावकरी परत येतांना त्याला त्याच्या खोलीच्या खिडकीतून दिसली. सगळे एकमेकांशी काहीतरी चर्चा करत होते.

सरपंच काही मडळींबरोबर घरात आले आणि बैठकीत चर्चा बसली.
सारंग काहीच माहीत नसल्याचे सोंग घेऊन आत बैठकीत गेला.

“काय झालं मामा ?? काही प्रॉब्लेम झालाय काय?? नाही गावात आज धावपळ दिसतेय म्हणून विचारल”

मामा सारंग ला काही सांगणार तोच अचानक त्यांची खोल नजर सारंग च्या चेहऱ्यावर स्थिरावली.

त्यांच्या एकटक सारंगच्या चेहऱ्यावर पाहन्यामुळे
सारंग घाबरला आणि विचार करू लागला ‘की माझ्या चेहऱ्यावर तर काही नसेल ना की जा मुळे कालच्या घटनेत माझा हात आहे हे कळलं असणार मामांना.’

तो घाबरत म्हणाला ” काय झालं? मा….मा”

” तुझी तब्बेत बरी नाही काय सारंग बेटा.. ? डोळ्याना सुज आलेली दिसतीये तुझ्या”

हे ऐकून सारंगच्या जीवात जीव आला… म्हणजे मामाला अजून काही नाही कळल नव्हतं तर.

तो चेहऱ्यावर नकली हसू आणून म्हणाला ” तब्बेत ठीक आहे ते…. जरा रात्री झोप नाही झाली म्हणून वाटत असणार कदाचित” अस म्हणून तो पुन्हा त्याच प्रश्नावर आला

“काय……. झालं……गावात???”

” अरे गावात काही नाही झालं.झालं ते पुलाजवळ. हायेवर काल रात्री एका गाडीचा अपघात झाला …गाडीत तिघे जण प्रवास करत असतील पती पत्नी आणि त्यांचं लहान मूल.

ते लहान मुल आणि पत्नी बाहेर फेकल्या गेले तर पतीचा गाडीतच मृत्यू झाला.
नशीब चांगलं म्हणून ते बाळ पुलाजवळच्या एक झुडुपात सुरक्षित राहील पण बिचारी त्याची आई मात्र तिथेच पुलाजवळ दगडावर डोकं ठेचून मरण पावली असणार…” सावकार सांगत होते..

हे सगळं ऐकुन सारंग स्तब्ध झाला.

त्याचा डोळ्यापुढे रात्री झालेले पूर्ण घटना रेंगाळायला सुरू झाली….
आता त्याला सगळं काही उलगडत जात होतं…

म्हणजे तो झुडुपातून येणारा लहान बाळाचा आवाज……ती रक्तबंबाळ स्त्री…… म्हणजे ती स्त्री जे इशारे करत आणि वाचवा वाचवा म्हणत होती तर ती मदत मागत होती तिच्या गाडीतल्या पतीला वाचवण्यासाठी…. झुडुपातून येणार आवाज ऐकून तिचा वाढलेला वेग…… आणि विश्या ने झाडावर दारूची बाटली आदडल्यावर झालेला जोराचा आवाज म्हणजेच अपघाताचा आवाज होता…..

सारंगला सगळं काही स्पष्ट दिसत होतं म्हणजे त्या स्त्रीचा मृत्यू दगडावर डोकं आदळून नाही तर विश्याने मारलेला दगडं डोक्यावर आदळून झाला होता…सारंग ला थोडं वाईट वाटलं,

तो दोन क्षण विचारात बुडाला होता पण अचानक थोड्या वेळात त्याचा चेहऱ्यावर ची भीती गायब झाली आणि तो एकटाच जोरजोरात हसू लागला.. ज्या घटनेला ते एक भुताची घटना म्हणून समजत होते तो एक अपघात होता तर….

सारंग ने लगेच फोन करून विश्या ला सांगितले आणि दोघेही जोरजोरात हसू लागले…

या घटनेनंतर थोड्या दिवसातच सारंग आणि विश्याची पुन्हा पुलाजवळ मैफिल बसू लागली.

काही दिवसांनी सारंगच्या वडिलांनी त्यांच्या शेतमालाच्या व्यापारात सारंगला टाकले आणि सारंग पुण्याला निघून गेला.

दोन वर्षांपासून सारंगला शहादतपूरला निवांत यायला वेळच मिळत नव्हता…पण आज वेळ काढून तो निघाला होता.

अचानक मोबाइल रिंगटोन वाजली आणी सारंगच ध्यान तुटलं.
तो लगबगीनं विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला..

फोन मामांचा होता… सारंगने फोन उचलला
” हॅलो”

“सारंग बेटा अरे कुठंपर्यंत आलास?
मला कळलं की तू गावाला येत आहेस”

“हो मामा येतोय मी”
आता……..जवळपास अर्धा तास तरी लागेल” सारंग गाडीच्या खिडकीच्या बाहेर पाहत आपण कुठंपर्यंत आलोय याचा अंदाज घेत म्हणाला…

सारंगने लगेच विश्याला देखील आपण येत असल्याची माहिती त्याने दिली आणि सोबतच शहरातून खास त्याच्यासाठी इंग्लिश दारू आणि भांग आणली हे पण सांगितलं…

हे ऐकून विश्या खुश झाला…
आज दोन वर्षांनीं दोघे जिगरी भेटणार होते.. आणि त्यातल्या त्यात मैफिल पण बसणार होती.

गाडी हायवे सोडून आता गावाकडे वळली आणि पुलावरून जाऊ लागली सारंग हा सगळा परिसर न्याहाळू लागला.
ही जागा अजूनही तशीच होती घनदाट झाडी अगदी निर्जन.

गाडी गावात पोहचली, उतरताच सारंगने ड्राइवर ला परत जायला सांगितले. एवढा लांबचा प्रवास करूनही त्याने ना चहा ना पाणी काहीच नाही विचारले. जोशीकाका मुकाट्याने गाडी वळून परत निघाले.

सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. सारंग ने थोडा आराम केला
आणि संध्याकाळ होताच बॅगीत लपवून ठेवलेल्या 2 दारूच्या बाटल्या घेऊन आणि आपली जुनी बुलेट गाडी काढून विश्याकडे निघाला.

” काय विशाल राव?? कस काय चाललंय ?? “
सारंग विश्याच्या घरात घुसत म्हणाला….

विश्या सारंगचीच वाट बघत होता… दोघेही घरच्यांसमोर औपचारिक गोष्टी संपुन बाहेर आलेत.

“आपण आज रात्री नेहमीप्रमाणे पुलाजवळ बसायचं
हे बघ तुझ्या दोस्ताने काय चीज आणली तर.” सारंग ने बॅग अर्धी उघळत त्यातील ब्रॅण्डेड दारूच्या बाटल्या विश्याला दाखवल्या

विश्या चे डोळे चमकले …
ठरल्या प्रमाणे रात्री 10 च्या सुमारास दोघेही पुलावर पोहचले..आणि त्या घनदाट शिवारात भयाण अंधाऱ्या रात्री त्यांची दारू सिगारेट ची मैफील पुन्हा सुरू झाली….

“यार विश्या इथे बसून जी दारू पिण्यात मजा आहे ना
ती शहरातल्या कुठल्याही बार मध्ये नाही”
सारंग ग्लास भरत म्हणाला….

” म्या बी लय दिवसांपासून इथं येऊन पिण्याच्या बेतात होतो
पण भाऊ तुम्ही नव्हते ना” विश्या म्हणाला

त्या दोघांना दुरुनच कुणीतरी सारख बघत होत…….

दोन वर्षांपूर्वी ह्या पुलाजवळच्या घटना आठवून दोघेही जोरजोरात हसत होते

“आता दोन वर्षे झालीत पण अजूनही गावातली कुणीही रात्री इकडे फिरकत नाही, सगळे खूपच घाबरतात” विश्या म्हणाला

“तस बघितलं तर तू पण काही कमी घाबरट नाहीस विश्या”
सारंग त्याची गंमत उडवत म्हणाला

“आठवते तुला? जेंव्हा शेतातल्या झिमा सोकार्याला झाडाला उलटे टांगून मारताना किती घाबरत होतास तू…आणि शेवटी ते काम मलाच करावं लागलं आणि जेंव्हा ती अपघातातली स्त्री इथे आली

तेंव्हा तुझ्या तोंडातून शब्दही निघत नव्हता…..”‘
असे म्हणून सारंग विश्या ला चिडवायला लागला…

विश्या थोडा हिरमुसल्या सारखा झाला पण लगेच तोही स्वतःची बाजू सावरत म्हणाला…

“जरी मी घाबरलो पण शेवटी त्या स्त्री ला दगडाने ठेचून मीच मारले हं… तुझ्या कडून तर गाडी पलटे ना सी झाली होती….अस म्हणताना अचानक विश्या ला सारंगच्या अगदी पाठीमागे कुणीतरी बसून एकटक त्यांच्याकडे बघत आहे असे दिसले.

तो थबकला….. त्याचा निशब्ध झाला, तो जोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याच्या तोंडातून जराही आवाज निघेना..

अचानक बोलता बोलता मधेच थांबलेला पाहून, सारंग विश्या कडे बघून म्हणाला “काय झालं??”

तर विश्या एकाद्या दगडाच्या मूर्तीसारखा डोळे मोठे करून एकसारखा सारंगच्या पाठी मागे बघत होता….

“विश्या …विश्या.. “सारंग च्या आवाजाने विश्या च ध्यान तुटलं

त्याने हाताने इशारा करून सारंग ला मागे वळून बघायला सांगितले..

सारंग मागे वळून पाहतो तर मागे काहीच नव्हतं

“काय झालं विश्या काहीच नाही इथे तर
आणि तू एवढा विचित्र का वागतोयस”

विश्या ने मागे बघितले तर कुणीच नव्हते
त्याला आश्चर्य वाटले
पण काहीतरी भास असणार अस समजून तो सारंगशी बोलूला

आता त्यांना दुरून दोन काळ्या आकृत्या बघत होत्या
एक हायवे च्या दिशेने तर दुसरी जवळच्याच शेतातून….

विश्या थोडा घाबरलेलाच होता म्हनून तो तिथून लवकर निघण्याचा प्रयत्न करत होता
पण सारंग मात्र ” अरे किती दिवसांनी इथं आलोय थोडं अजून थांबुयात ना ” म्हणत विश्याला जबरदस्ती थांबवत होता.

तर अचानक त्यांना एक आवाज ऐकू येऊ लागला आणि दोघांचा हृदयाचा ठोका चुकला…..हा आवाज लहान बाळाच्या रडण्याचा होता….अगदी तसाच जसा दोन वर्षांआधी होता.

दोघांचंही हात थरथरायला लागले कारण आवाज त्याच झुडुपातून येत होता…..

“हा…. कसला ….योगायोग ….की.काही??…..विश्या शंकेने पुटपुटला”

हा जर योगायोग नसणार तर…….

म्हणजे ती स्त्री……….

दोघेही ताडकन उठून गाडीवर बसले आणि…..

हेडलाईट च्या प्रकाशात त्यांना जे दिसले त्याचा त्यांना विश्वास बसला नाही…

समोर तीच स्त्री उभी होती जिचा दोन वर्षांपूर्वी इथेच मृत्यू झाला होता…..त्यांना कळून चुकले की ते या काळचक्राचे भाग झाले होते.

पण आज मात्र ती पुढे सरकत नव्हती
सारंग ने गाडी सुरू करुन वेगात गावाच्या दिशेनं वळवली आणि गाडी बरोबर झिमा सोकार्याच्या शेताजवळ येताच बंद पडली…..

दुसऱ्या दिवशी सकाळी गावात सगळीकडे पुन्हा खळबळ माजली, सर्व गावकऱ्यांनी पुलकडे धाव घेतली. पुलाजवळ या आधी गावकऱ्यांनी दोन घटना पहिल्या होत्या, एक झिमा सोकाऱ्याचा मृत्यू आणि दुसरा म्हणजे अपघात.

पण आता मात्र गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण आता जे दृष्य त्यांच्या समोर होते ते झालेल्या दोन्ही घटनांची एकाच वेळी प्रचिती देत होते.

कारण काळाने काल रात्री एक नव्हे तर दोन बळी घेतले होते आणि अगदी त्याच शैलीत ज्या शैलीत झिमा सोकारी व ती स्त्री मारले गेले होते.

सारंगच प्रेत छिन्नविच्छिन्न अवस्थेत झाडाला उलटे लटकलेले होते तर विश्याचा दगडाने डोकं ठेचून मृत्यू झाला होता.

गावकऱ्यांना हा सारा प्रकार कळायला जास्त वेळ लागला नाही.

दुरून टकटक पाहणाऱ्या त्या दोन काळ्या आकृत्या (एक झिमा सोकाऱ्याची आणि त्या स्त्रीची) हळूहळू मावळत गेल्या. दोन वर्षानंतर काळचक्र पूर्ण झालं.

समाप्त!!!


  • सुमित टेंभरे

हे वाचलंत का? –

Share