प्रायश्चित्त (बोध कथा)

मराठी कथा / marathi story

praychitta-marathi-story

marathi story

प्रायश्चित्त

खर सांगायचं झालं न, तर रविवारच्या निवांत सुट्टीनंतर सोमवारी कामावर जायला खूपच आळस येतो. नेहमीप्रमाणे आजही ऑफिस ला जायला थोडा उशीर झालाच.

जाताच माझ्या कॅबिन बाहेर बाकावर तो पांढरे मळलेल्या शर्टवाला माणूस बसलाच होता. मी दिसताच ताडकन उभा राहून माझ्या जवळ आला “साहेब ते …फार्मावर तुमची सही….” तो काही पुढे बोलणार तोच मी रागाने त्याचा हात झटकला.

“काय विचित्रपणा आहे हा…अहो मी आताच तुमच्यासमोर ऑफिस ला येतोय ना..जरा मला श्वास तर घेऊ द्या…..आलोही नाही तर झालं तुमचं पुन्हा सुरू.”

मी झटक्यात कॅबिन मध्ये शिरलो….” या मुर्ख लोकांना सरकारी काम म्हणजे काही भाजीपाला वाटलाय की काय…की कधीही उठून आले की काम झालं समजा.

सकाळी सकाळी कुणाचं तोंड बघावं लागलं बघा..म्हणजे आजचा दिवस खराब जाणार म्हणजे समजा ! तसही सोमवार कुणाला आवडतो… ?” मी स्वतःशी बोलतच माझ्या आरामदायी खुर्चीवर बसलो.

ऑफिस चपराशी सदाकाकांनी लगेच पंखा सुरू करून, थंड पाण्याचा ग्लास टेबलावर ठेवला, हा त्यांचा नित्यक्रम .

मी एक घोट पाणी प्यायलो आणि खुर्चीला मागे पाठ टेकवून एक दीर्घ श्वास घेतला. एक गोष्ट मात्र नक्की, कामावर येण्याचा जरी मला कंटाळा वाटत असला पण या खुर्ची वर बसल्यावर एक उर्जाचं माझ्या अंगात सळसळते.

एक पावर या खुर्चीमध्ये असावी. खुर्चीवर बसताच माझी मान अभिमानाने ताठ होई. नोकर-चाकर, सरकारी गाडी, सरकारी घर, मर्यादितच काम, पुरेसा पगार, भत्ते, याशिवाय समाजात मानप्रतिष्ठा…. हे सगळं दिल आहे मला या खुर्चीने.

पण ही खुर्ची मिळवण्यासाठी मी किती कष्ट केले आहेत याचा कुणाला ठाव नसणार. १० वी राज्यातून प्रथम, 12 वी राज्यातून चौथा, ग्रॅज्युएशन- युनिव्हर्सिटीतुन प्रथम आणि MPSC मध्ये राज्यात 75 वा ह्या सगळ्या भिंतींवर टांगलेल्या सर्टीफिकेट वर मी अभिमानाने नजर टाकत असो.

कारण हा सगळा प्रवास कधी सोपी नव्हताच. दिवसरात्र डोळ्यात तेल घालून केलेला अभ्यास, सणासुदीला, लग्नकार्याला घरी न जाण्याचा त्याग, एवढ्या ‘कट थ्रोट’ ज्याला म्हणतात अश्या कॉम्पिटेटीव वातावरणात पुढे पुढे जाणे कधीही सोपे नव्हते.

मला ह्या गोष्टी आठवल्या की खरंच स्वतःचा खूप अभिमान वाटतो. आणि का वाटू नये बर!
या सगळ्या प्रवासात माझ्या पालकांनी केलेला सहयोग मी कधीही विसरू शकणार नाही.

मी आजही कुठल्याही भाषणात संबोधताना किंवा माझ्या मित्रमंडळीना पण, माझ्या वडिलांनी किती प्रतिकूल परिस्थितीतुन माझ्या शिक्षणासाठी केलेला त्याग आवर्जून सांगत असतो. घरी सव्वाकोटी दारिद्रय.

माझ्या बापाने लोकांच्या शेतात राब राब राबून माझ्या शिक्षणाचा खर्च पूर्ण केला.. वह्या पुस्तक, कपडे-लत्ते, कुठल्याही गोष्टीची मला कमी पडू दिली नव्हती.

त्यांचा डोळ्यांत मला नेहमी माझ्या भविष्यासाठीची तळमळ दिसत असे. गरिबीमुळे आलेल्या लाचारीतून निघणाची वाट ते जणू माझ्यात शोधत असत.

ते मला नेहमी सांगत “तू फक्त अब्यास करून मोठ्ठा सायेब बन लेका …बाकी सगळं मी पाहतो”. मला तेंव्हा असलेल्या गरिबीची कीव यायची आणि आज त्या गरिबीचा राग येतो. माझ्या मते तर गरीब असणे म्हणजे पाप आहे.

मी माझ्या वडिलांच्या त्यांच्या अपेक्षे वर खरा ठरलो. आज परिस्थिती बदलली आहे. आज ती गरिबीची पायरी ओलांडून पार वर आलोय.

आता तर जिल्ह्यातील बरीचशी श्रीमंत हस्ती पण मला रामराम ठोकल्याशिवाय पुठे जात नाहीत. मोठमोठ्या नेत्यांशी बैठका, पार्ट्या ह्या सगळ्या कुठं त्या गरिबीत लाभल्या असत्या. हे सगळं शक्य झालं ते शिक्षणामुळेच.

माझ्या बापाला शिक्षणाचं महत्व पटलं म्हणून मला शिकवलं पण आजकालचे गरीब लोक यांना मुळीच अकला नाहीत…अरे जरा जग बघा म्हणा…शिका आणि शिकवा आपल्या मुलांना… मग बघा…..ते म्हणतात न ‘शिक्षण हे वाघिणीच दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही’.

वा! वा! काय फिलॉसॉफीकल विचार झालेत बघा माझे … हे लिहून ठेवायला हवेत, म्हणजे कधी भाषणात बोलताना भारी मुद्दे वाटतील मी स्वतःशीच बोललो.

असे म्हणून मी माझ्या ड्रॉवर मधून डायरी काढून लिहू लागलो…….”””……..वाघिणीचे दूध आहे….।।।। ……गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” ह्म्म
डायरी ठेऊन मी टेबलवर ठेवलेल्या फाइल्स चाळू लागलो.

मागील आठवड्यात 3-4 वेळा मिटींग साठी जिल्ह्याला जावे लागले होते म्हणून बऱ्याच फाइल्स माझ्या टेबलावर ढिग करून पडल्या होत्या.. जास्त काम नसते मला… नुसतं सही मारण्याचे काम … बाकी कागदपत्रे पडताडणी चे काम इतर सहकारी मंडळींना मी वाटून दिले होते.

आठवड्याभऱ्याच काम दोन दिवसांत करू शकतो. पण सरकारी काम वेळेत झालं तर मग ते काम कसलं….एक आणखी गोष्ट….माझ्या मते सरकारी अधिकाऱ्यांना लाभलेलं सर्वात मोठं शस्त्र असेल तर ते आहे.

मीटिंग!! अधिकतर meetings मला फावल्या वाटतात…. या माझ्या विचारांशी माझ्या काही अधिकारी मित्रमंडळी च दुमत आहे …पण असो!! माझ्या मते त्यांना हे शस्त्र बरोबर वापरता येत नसावं…माझं कस आहे दोन तासांनी मीटिंग आणि दिवसभराची सुट्टी.

विकासाची काम आपल्या परीने करावीत अस माझं स्पष्ट मत…..

अचानक फोन वाजला आणि मी विचारांच्या तंद्रीतून बाहेर आलो.. मी फोन उचलला

” हॅलो…??”

“नमस्कार तहसीलदार साहेब….भाटिया बोलतोय.”

” नमस्कार भाटिया जी!”

“काय सगळं मजेत???”

“तुमच्या कृपेने सगळं मजेत !!!” मी म्हणालो

“उद्या आमच्या फार्महाऊस वर छोटीसी पार्टी आहे..तर आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे…..!”

“नक्की नक्की भाटिया जी….साक्षात तुम्ही फोन केल्याव यावेच लागणार …हा हा हा”

“हा हा हा”

भाटिया हा शहरातला सर्वात श्रीमंत उद्योगपती…तसेच स्थानिक राजकारणात बलाढ्य संपत्तीमुळे दबदबा असणारा…त्यांची छोटीसी पार्टी जरी म्हटली तरी लाखोंची उलाढाल.

मला बोलावण्याचा त्यांचा उद्देश मला साफ माहीत असतो पण कस आहे अश्या व्यक्तींशी चांगले संबंध असणे कधीही चांगलेच.

उद्या मीटिंग चा बहाणा सांगून पार्टीला जायचा निर्णय मी फोन सुरू असतानाच केला.

“साहेब…..!” सदाकाकांनी आवाज दिला..

“बोला !!!”…मी त्यांच्याकडे न बघताच टेबलावरची एक फाईल चाळत म्हणालो…

“साहेब…..ते”

“अहो बोला….”

” तो पिंपळगाव चा माणूस….त्याला तुमची सही हवी…
एक आठवला झालाय रोज येत आहे”

रोज मी येण्याआधीच माझ्या कॅबिन समोर बसणाऱ्या पांढऱ्या मळलेल्या शर्टवाल्या माणसाबद्दल ते बोलत होते….ज्याला बघूनच मला आधीच खूप राग यायचा.

“त्याला म्हणा आधी सेतुतून कागदपत्रे पडताडून ये म्हणा”

“ते तो करून आलाय साहेब”

“मग सांगा त्याला साहेबांच्या सहिसाठी 8-10 दिवस अजून लागतील म्हणून …काय कागदपत्रे आहेत तर इथे सोडून जा म्हणा”

“पण ….साहेब तो 8 दिवसांपासून येतच तर आहे…त्याला थोडं अर्जंट आहे म्हणे”

अर्जंट शब्द ऐकताच मी खळवळलो…..

” तुम्ही माझ्या ऑफिस चे कर्मचारी आहात की बाहेरच्या लोकांचे ?” …..”सरकारी काम अशी होत नसतात सदाशिवकाका” मी थोडा आवाज चढवून बोललो.

“अर्जंट कुठलंही काम होत नसत……आणि होत जरी असल तर मी ते करणार नाही …. हे नेहमीसाठी लक्षात ठेवा.

माझ्या शिक्षणाच्या वेळी माझ्या बापानेही माझ्या कागदपत्रांवर सह्यांसाठी कित्येकदा खस्ता खाल्ल्या….काम सोडून तहसिल वर उन्हातान्हात रांगेत लागून काम केलीत…..कित्तेक चकरा मारल्या…..त्यांनी नाही म्हटलं कधी अर्जंट आहे!!!

माझ्या बापानी हे सगळं सोसलाय तर यांना मुभा का??? यांनीं पण सोसायला पाहिजे…यानंतर माझ्याजवळ अश्या फालतू लोकांच्या शिफारशी घेऊन यायचं नाही” मी सदाशिवकाकांना बजावून सांगितलं…

“अर्जंट आहे म्हणे….”

सदाशिव काका खाली मान घालून निघून गेले….

शेतीचा 7/12, उत्पन्नाचे दाखले, जातप्रमानपत्र, इत्यादि इत्यादी सारख्या अनेक कागतपत्रांवर माझ्या स्वाक्षरीसाठी बरेच जण सदाशिवकाकांशी बोलत…

की जरा साहेबांशी बोलून लवकर करून घ्या… सदाशिवकाकाही फार साधे होते कुणी काहीही सांगितले तर तर लगेच करायचे… पण मला मात्र या गोष्टीची चिड होती.

लगेच मी उठून लंच साठी निघून गेलो बाहेर तो माणूस बसलाच होता.आता त्याला बघून मी अजूनच चिडलो.
याच काम आता लवकर तर करायचंच नाही हे मी मनोमनी ठरवलं.

दुसऱ्या दिवशी मी मीटिंग आहे असं सांगून भाटिया जी च्या पार्टीला गेलो…..पार्टीत फार दिगग्ज येऊन गेलेत.

पार्टीवरून संध्याकाळी परततांना मात्र एक विचित्र गोष्ट घडली.
मी माझी कार घेऊन सपत्नीक निघालो होतो. बस स्टॉप च्या सिग्नल वर गाडी थांबली….मी पार्टीत वाजत असलेलं गाणं गुणगुणत एकडेतिकडे न्याहाळत होतो….

तोच माझी नजर बसस्टॉप वर उभ्या असलेल्या एका माणसावर थांबली….
हा तोच माणूस होता…सिग्नल लागलेला होता…तोवर मी त्याला न्याहाळू लागलो…तेच माळलेल पांढर शर्ट घालून उभा होता.

बसची वाट बघत असावा…….हाती एक पिशवी, पायात चप्पल, उन्हा पासून संरक्षण म्हणून डोक्याला एक दुपट्टा हा त्याचा अवतार.

“हा….माझ्या ऑफिस मधूनच परत येत असावा”…. म्हणजे दिवसभर हा फक्त माझी वाट बघत होता….जे तो गेल्या 10-12 दिवसांपासून करत होता….एक कठोर उदासता त्याच्या चेहऱ्यावर होती.

काय माहीत का पण व्यक्ती आणि परिस्थितीभेदाची चोमट भावना मला एक जोरदार चपराक देऊन निघून गेली…ही भावना माझ्या मनाला फार आतवर झोंबून गेली…. मी अस्वस्थ झालो.

क्षणासाठी मला माझाच विसर पडला….आणि त्या वडीलधाऱ्या माणसात स्वतःला बघू लागलो…त्याचा चेहऱ्यावरच्या उदासतेला मी कारणीभूत असल्याचं जाणवलं.

सिग्नल सुटला……उद्या ऑफिसला जाताच त्याच काम करण्याचं मी ठरवलं.

दुसऱ्या दिवशी मी वेळेवरच ऑफिस ला पोहचलो.
पण….पण….आज तो माणूस तिथे बाकावर बसलेला नव्हता…

मी कॅबिन मध्ये जाऊन बसलो..सदाशिवकाकाही नव्हते….मी दोन वेळा आवाज दिल्यावर सदाशिवकाका आत आलेत…त्यांनी पंखा लावला…व लगेच निघून जायला निघेत….आज फार गंभीर वाटत होते….त्यांना याआधी अस विचित्र वागताना मी कधीच पाहिलं नव्हतं…

“सदाशिवकाका…??” काय झालं…

“आज नाही का आला तुमचा तो पिंपळगाव चा माणूस…”
मी थोडा मस्करीत म्हणालो…वाटलं की त्या दिवशी मी सदाशिवकाकांना जरा जास्तच बोललो तर रागावले असतील थोडे.

“नाही साहेब…… नाही आला तो….आणि परत येणार पण नाही “
म्हणत ते निघू लागले…

मला काही कळलं नाही…
मी थोडा गंभीर झालो..

“का??”

“साहेब तुम्हीच म्हणाले ना 8-10 दिवस अजून लागतील”

“अहो पण…..”

“आज मी त्यांच काम करणार आहे….द्या कुठल्या कागदावर सही पाहिजे…लगेच करतो’

सदाशिवकाका थोडे आश्चर्यचकित झाले…

” आता काही उपयोग नाही साहेब”

” म्हणजे ??? का??”

“साहेब मी लहान माणूस. तुम्ही आमचे साहेब.गेली 35 वर्ष या ऑफिस मध्ये काम करतोय….या भागातल्या लोकांना चांगला ओळखून आहे.

ते गरीब कष्टकरी आहेत…म्हणूनच काहींच्या कामाच्या शिफारशी घेऊन येत असतो…तुमच्या परस्त कित्तेक साहेबांच्या खाली काम केलंय मी….पण आज एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते साहेब.

कारण तुम्ही एका गरीब परिस्थितीतुन वर येऊन साहेब बनलात.. म्हणून तुम्हीच समजू शकता…झालं तर माफ कराल..

“झालं तरी काय काका???””

“चूक!!!”

“चूक????” मी आश्चर्याने विचारले

“होय चूक झालीय, तेही तुमच्या हातून”

“तो पिंपळगाव चा माणूस एक गरीब शेतमजूर आहे…गावात पत्नी व मुलींसोबत गावात राहतो…परिस्थिती हलाखीची पण मुलगी फार हुशार.

कुठलीही कोचिंग न लावता 12 ला 92℅ मिळालेत…डॉक्टर व्हायचंय तिला आणि बापनेही पुरा दम काढलाय तिला शिकवण्यासाठी…राब राब राबला.

पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे…. गव्हर्नमेंट मेडकल कॉलेजलाही फि भरणे शक्य नाही…पण जर EBC (Eeconomical backword certificate) फॉर्म भरुन आपण सही दिली असती तर शिष्यवृत्ती मिळू शकणार होती…”

“कालची फॉर्म भरायची शेवटची तारीख होती….म्हणून गेली पंधरा दिवस तो बाप मजुरी सोडून व रोजचा गावापासून चा बसचा खर्च करून दिवसभर उपाशी पोटी इथे यायचा.

फक्त एकच आशा घेऊन की…माझी लेक मोठी डॉक्टर होणार …पण तुम्ही….” सदाशिवकाका शांत झाले.

थोडा वेळ मी काहीच नाही बोलू शकलो…

” साहेब …तुम्ही म्हणाले की तुमच्या वडिलांनी हे सगळे सोसले आहे….तर मग तुम्ही बाकीच्या बापांना का हे सोसू देता???’

मी लाजिरवाणी होऊन काकांकडे पाहत होतो.

“माझ्यावर अन्याय झाला म्हणून मला दुसऱ्यांवर होणारा अन्याय मान्य आहे किंवा मी जर दुसऱ्यावर अन्याय करतो तर वावग काय कारण मीही सोसलं आहे तर यानेही सोसलच पाहिजे ही भावना कुठवर बरोबर आहे हे तुम्हीच ठरवा साहेब.

सासूने सुनेवर केलेले अत्याचार, सिनिअर ने ज्युनिअर वर केलेली रॅगिंग, शिक्षकाने त्यांचा विद्यार्थी जीवनात ‘छळी लागे छम छम, विद्या येई घम घम’ या तत्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर सोसलेली शिक्षा त्यांचा विद्यार्थीना देने याच विचारसरणीचे पडसाद असावेत असे मला वाटते.

जनतेतूनच उभा झालेला नेता जनतेलाच लुबाळतो तर
बस मध्ये खिडकी जवळ बसलेला बाहेरच्यांना मागच्या दुसऱ्या बसमध्ये येण्याचं सल्ला देतो.

आपण याच समाजाचे घटक असल्याचं का विसरतो? रेस्टॉरंटमध्ये 1000 रुपयाचं जेवल्यानंतर खुशाल 100 रुपये टीप देणारे आपणच, तर दिवसभर उन्हातान्हात रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या भाजीपाला वाल्याशी 5-10 रुपयांसाठी भांडणारे आपणच.”

“गरज आहे ते गरीब व न बोलणाऱ्या लोकांचा आवाज होण्याची.
श्रीमंतांची बरीचशी कामे पैसा नावच साधन करत असतात.

तेच दुसरीकडे बोलबच्चन लोक त्याच्या कलेने काम करून घेतात. राहतात ते गरीब व न बोलणारे साधे लोक. आणि तेच बरेचदा टारगेट होतात करण ते उठ म्हटलं की उठतात आणि बस म्हटलं की बसतात..”

“भ्रष्टाचार फक्त पैसे लुबाळून होत नसतो….. तर तुमच्या कामाची शैलीही कुठेना ना कुठे सिस्टिम मध्ये भ्रष्टाचाराला दुजोरा देत असते…”

“लोकांचे आयुष्य फक्त बंदुकीच्या टोकावरच नाही तर तुमच्या पेनाच्या टोकावरही तेवढेच अवलंबून असते साहेब”

‘ह्या लोकांनां सरकार कोण आहे हे माहीत नाही….
यांच्यासाठी इथे तुम्हीच सरकार आहेत….

सरकारच सगळी काम नाही करणार”
ते आपल्या पासून सुरू करावे लागणार…

“हे चक्र तुम्ही आणि फक्त तुम्ही तोडू शकता साहेब.

तुमच्या प्रामाणिक कामावर खूप लोकांचे भविष्य अवलंबून आहे साहेब”‘

मी एकटक होऊन ऐकत होतो…. मला स्वतःची लाज वाटायला लागली होती….मला माझी चूक कळली….मला माझ्या बापाने माझ्या साठी केलेले कष्ट आठवले… त्या माणसात मला माझा बाप दिसला आणि मी शहरलो….

मी लगेच त्या माणसाची माहिती काढून त्यांचा घरी गेलो….पण तोवर वेळ निघून गेली होती….Last date पर्यंत सर्टिफिकेट submit करू न शकल्यामुळे ऍडमिशन होऊ शकली नाही…आणि ती जागा दुसऱ्या विद्यार्थ्यांला मिळाली.

मी स्वतःहून जाऊन कॉलेज ला चौकशी करून आलो पण काही उपयोग झाला नाही…
एका गरीब हुशार मुलीचे आणि तिच्या कुटूंबाचे स्वप्न मी भंग केल्याचा पश्चाताप मला होऊ कागला.

पुढे तिच्या संपुर्ण शिक्षणाची आर्थिक जबाबदारी मी घेतली…पुढच्या वर्षी तिचा नंबर गव्हर्नमेंट मेडिकल ला कागला…तिच्या घरच्यांना समाधान वाटले.

आजही मला तिच्या आणि तिच्यासारख्या कित्तेक विद्यार्थ्यांच्या माझ्याकडून कळत नकळत वाया गेलेल्या शैक्षणिक वर्षाची चूक टोचत राहते..आणि त्याच प्रायश्चित्त मी आजही करत आहे.

आज या गोष्टीला 20 वर्ष झाले आहेत.. आता सदाशिवकाका तर नाही आहेत…पण त्यांचे शब्द मला आजही आठवतात..आणि आजपर्यंत एकही विद्यार्थ्यांच किंवा गरजू व्यक्ती च काम 1 तासही उशीरा झालं नाहीं…आपलं काम प्रामाणिकपणे करणे हेहि एक समाजसेवा आहे हे कळलं.

मी बदललो तुम्ही पण विचार करा.

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

धन्यवाद!!!


Share