२२ किमी…एक विचित्र रस्ता

marathi story / marathi katha

22-km-marathi-katha

२२ किमी…एक विचित्र रस्ता

मोठ्या शहरांमध्ये राकेश बँक मध्ये नोकरीला होता. कामाचा चांगला परफॉर्मन्स बघता, त्याची नुकतीच तालुक्का लेव्हल वर छोट्या बँक मध्ये बँक मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली होती.

या प्रमोशनचा राकेश तसेच त्याच्या पत्नीला अत्यानंद झाला. परंतु आनंदावर थोडे दुःखाचे सावट पडलेच होते. कारण मोठया शहरामध्ये राहणाऱ्या राकेशला आता छोट्या शहरात नोकरीसाठी जावे लागणार होते.

पण आत्ता बँक मॅनेजर झाल्याच्या आनंदाने दुःखावर विझन पाडलेले होते. तसेच त्याचे नवीन ऑफिस हे शहरापासून किमान २२ किलोमीटर अंतरावर च असल्याकारणाने हा काही मोठा प्रश्न नव्हता.

राकेश आता कामावर रुजू झाला होता. पहिलाच दिवस पण कामाचा लोड असल्याकारणाने आणि बँकेची मोठी जबाबदारी असल्याने त्याला बँक मध्ये ८ कधी वाजले काही कळलेच नाही.
सर्व आवरून तो घरी जाण्याकरिता तयार झाला.

सर्व स्टाफ आत्ता पर्यत घरी देखील पोहचलेला असेल, या विचारात तो सेक्युरिटी पर्यंत जाऊन पोहचला.

सेक्युरिटी ने त्याच्या समक्ष बँकेला कुलूप लावले. राकेशला “गुड नाईट” म्हणत राकेशच्या पाठमोवऱ्या आकृतीकडे बघत सेक्युरिटी त्याच्या ठरलेल्या चेयरवर जाऊन बसला.

राकेशने स्वतःच्या डोक्यावर हेल्मेट चढवून गाडीला(दुचाकी) किक मारली. व तो निघाला आपल्या घराकडे.

भरधाव वेगाने त्याची दुचाकी रस्ता कापत चाललेली होती.
त्याला २२किलोमीटर अंतर लवकरात लवकर कमी कस करता येईल अस झाल होत.

३४ वर्षीय राकेश दिसायला रुबाबदार, उंच आणि देखणा त्यात बँकेच्या वेशात अजूनच खुलून दिसत होता.

भरधाव वेगामुळे त्याचे केस वाऱ्यासोबत खेळत होते. अचानक त्याने कडकडून ब्रेक मारला. दुचाकी रस्त्याच्या मधोमध थांबली.
संपूर्ण रस्त्यावर शांतता, जणू संपूर्ण रस्ता हा त्याच्यासाठीच बांधून ठेवला असावा.

रिंग करणारा मोबाइल त्याने पँटच्या खिशात हात घालून बाहेर काढला. स्क्रिन वर बायकोचे नाव झळकत होते. फोन उचलता क्षणी बायको भांडणाच्या पवित्र्यात आली.

“किती वेळ…..? पाच ते सहा कॉल केलेत! तू आत्ता कॉल उचलेला.”

“मी……..मी…….. तुला कॉल करणारच होतो निघताना.” राकेश घाबर्या स्वरात स्वातीला म्हणाला.

” बकरी सारखा मी…मी…काय करतोयस…?अजून किती वेळ?”

” मी अर्ध्या रस्त्यात आहे!पोहचतोच थोड्या वेळात.” राकेश घाई गडबडीत म्हणाला.

“बर….ये लवकर….!” अस म्हणून स्वातीने तिकडून नाक मुरगळात फोन कट केला.
राकेश च्या चेहऱ्यावर हास्य झळकले. या भांडणाला प्रेमाची साद होती. कारण राकेशच स्वातीचे लव्ह म्यारेंज झालेले होते.

तिच्या जुन्या आठवणीला राकेश स्वाधीन झाला होता. तो विसरला की आपण रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून आहे ते. जोराच्या हवेमुळे तो भानावर आला.

सर्व झाडेझुडपे हवेने हलत होती. सर्वत्र धूळ व झाडाचा पाला-पाचोळा उडत होता.

सर्वत्र रस्ता घनदाट जंगलाने व्यापलेला होता. सर्वत्र काळोख पसरला होता. त्या जागेवरून अजून देखील शहराचे अस्तित्व दिसत नव्हते.

झाडांचा रंग नेमका हिरवाच असतो, की अजून दुसरा कोणता हा त्याच्या मनामध्ये एक विचार आला.

त्या विचाराला देखील एक कारण होत. कारण चंद्राच्या सौम्य प्रकाशात ते झाडे हिरवे नसून काळे भासत होती. रातकीटक त्या भयानक वातावरणात किर्रर्रर… किर्रर्रर….. आवाज करून भर घालत होती.

हवेचा जोर वाढला होता. परत त्याने मोबाईल स्क्रीनवर बघितले. त्यात ९:१५ झालेले होते. अजून त्याला १४ किलोमीटर अंतर कापायचे होते.

पहिल्याच दिवशी ऑफिस मध्ये उशीर झाल्यामुळे घरी गेल्यावर स्वाती त्याला फाडून खाणारच होती.

मोबाईल पँटच्या खिशात ठेऊन त्याने दुचाकीला किक मारली. व परत त्याचा प्रवास सुरू झाला. झरझर वेगाने झाडे मागे पळत सुटायला लागली.

हेड लाईट चा जितका उजेड पुढं जात होता. तसतसा काळोखातील लांब लचक रस्ता उजेडातून पार होत होता.

तर साइड मिरर मध्ये दुचाकीचा अर्धा भाग अंधारात दिसत होता.

दूरवरून राकेशला रस्त्याच्या कडेलाच जंगलात चौकोनी पांढऱ्या आकृत्या जमिनीवर दिसल्या. तो अचानक दचकला.

त्या असंख्य आकृत्याच्या जवळून जाताच त्याच्या लक्षात आले की ते स्मशान भूमी त्याने सकाळी ऑफिस ला जातानाच बघितली होती. त्याच्या मनामध्ये आत्ता थोडी भीती निर्माण झाली होती.

कारण रात्रीच स्मशान म्हटलं की लोकांच्या डोक्यात भूत प्रेत असलंच काहीतरी डोक्यात येत त्या लोकांमध्ये राकेश सुध्दा आहे. स्मशानभूमीचा परिसर पार झाला होता.

अचानक त्याच्या पाठीवर कोणी तरी हाताने थोपटले. तसेच राकेश ने डोळे विस्फारले. त्याने स्वतःला सांभाळत प्रयत्नशील दुचाकीला कचकचून ब्रेक मारला. दुचाकी च्या ब्रेक चा कर्कश आवाज संपूर्ण जंगलात घुमला.

राकेश त्याच्या दुचाकीवरून खाली पाय टेकवून एकाच जागी स्तब्ध झाला. त्याच्या संपूर्ण शरीराला आत्ता थरकाप सुटला होता.

चेहऱ्यावर घामाचे टिपूस जमा झाले होते. त्याने स्वतःचे डोळे कचून बंद केले. हृदयाची ढळढळ आत्ता वाढली होती.

त्याला दुचाकीच्या मागे बघून वास्तवीकतेला सामोरे जावे लागणार होते. थरथरत त्याने देवाचा जप चालू केला. इच्छा नसतांना त्याला मागे बघावे लागणार होते. डोळे तसेच मिटलेले.

शरीराचा कंप आणि स्वास वाढलेला. हृदयाच्या धडकीचा आवाज आज त्याने प्रथमच इतका ऐकला असेल. थरथरत्या आवाजात राकेशने विचारले.

” मागे…..को…को…कोण आहे….?”

हळूच त्याने आपली मान मागे वळवली. मागे वळून त्याने हळूच एक डोळा उघडून प्रसंगाची शहानिशा केली. मागे त्याला काळोख आणि फक्त काळोखच दिसला. तसाच त्याने सुटकेचा स्वास सोडला.

हा भास की अजून काही या विचारात त्याने परत दुचाकीला किक मारली. त्याच विचारात तो घराच्या दिशेने निघाला.

घराची बेल वाजताच आत मधून स्वातीने दार उघडले.

“इतका उशीर…..?” स्वाती स्वर चढवत म्हणाली. पण त्या प्रश्नाला उत्तर न देताच राकेश तिला बाजूला सावरत दरवाज्यातून सरळ फ्रेश व्हायला गेला. स्वातीने स्वतःचे खांदे उडवले.
रात्रीचे जेवण आटपून राकेश झोपण्यासाठी अंथरुणावर गेला.

अंथरुणावर पडून बराच वेळ झाला, पण त्याला झोप येत नव्हती. सारखीसारखी त्याला त्या रस्त्यावरच्या प्रसंगाची आठवण होत होती.

तसेच सोबत अचानक भीतीची लहर विचाराला साथ द्यायची.
” खरच कोणी आपल्या मागे होते का?”

आपल्याला भास झाला हे स्वतःच्या मनाला पटवून राकेश झोपेच्या स्वाधीन झाला.

दिवस उजळला. आज त्याचा ऑफिस चा दुसरा दिवस होता. नेहमी प्रमाणे स्वातीने त्याला टिफिन बनून दारामधून निरोप दिला.

राकेश ऑफिस मध्ये पोहचून दिवसभर डोक्यात काही एक विचार न आणता काम पूर्ण करून एक कटाक्ष भिंतीवर टिक टिक करत असलेल्या घड्याळीवर टाकला.

“छे…. परत कालच्या इतकाच वेळ झाला. आज तर माझी खैर नाही.” तो स्वतःशीच पुटपुटला.
सर्व आवरून त्याने दुचाकीला किक मारली.
आणि भरधाव वेगाने त्याने घराचा रस्ता गाठला. सुसाट वेगाने राकेश त्या रस्त्यावरून चाललेला होता.

अचानक त्याच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. कालची वेळ आणि कालचा प्रसंग जश्याचा तसा त्याच्या समोर उभा राहीला. नकळत भीतीने त्याच्या मनामध्ये काहूर माजवला.

तसाच त्याने दुचाकीचा कान पिरगळला व सुसाट वेगाने त्याची दुचाकी त्या सामसूम रस्त्याला चिरत निघाली.

आणि जे अनपेक्षित होते तेच घडलं. परत कोणीतरी त्याच्या पाठीवर हाताने थोपटले. तसाच त्याचा दुचाकीवरून नियंत्रण सुटले व तो रोडवर दुचाकी सकट खूप लांब घासत गेला. देवाची कृपा त्याला जास्त लागले नव्हते. तो अलगद त्या दुचाकीवर पळून होता.

तो स्वतःला सावरत दुचाकीला सरळ करत उभा झाला. बहुतेक त्याच्या पायाला थोडा मार बसलेला असेल म्हणून त्याने लचकलेल्या पावलाने दुचाकी उचलून सरळ केली.

क्षणाचा देखील विलंब न करता त्याने दुचाकी सुरू करून तेथून धूम ठोकली. तर थेट त्याने घरच गाठले.

लागलेला मार आणि दुचाकीची ही अवस्था पाहून स्वाती पार घाबरलेली होती. स्वातीने राकेश च्या पायाला हळद लावलेली.

त्याने तिला यातलं अजून काहीएक सांगितलेले नव्हते. रात्र खूप झाली होती. राकेश आणि स्वाती दोघेही आता झोपी गेलेले होते. स्वातीने हळूच स्वतःचा कळ बदलून राकेश कडे बघितले. तो गाढ झोपी गेलेला होता.

पण राकेश ने फक्त डोळे बंद केले होते.हे तिच्या लक्षात नाही आले. ती परत गाढ झोपी गेली. परंतु त्याच्या डोक्यात ते वादळ अजून देखील सैरावैरा पळतच होते.
” काय होते ते…..?” या सर्व विचारात तो झोपी गेला.

आज देखील ऑफिस मधून निघतांना त्याला नेमका दोन दिवसांपासून जो वेळ व्हायचा तोच झाला होता.

नेहमी प्रमाणे सेक्युरिटी ने त्याला “गुड नाईट” म्हटलं व तो त्याच्या जागेवर जाऊन बसला.
सर्व आटपून राकेश दुचाकीवर स्वार झाला. आणि हेल्मेट डोक्यावर चढवत मनाशी एक निर्णय घेऊन तो निघाला.

” आज पाठीवर कोणी थोपटले की त्याच क्षणी त्याचा हात पकडायचा. खर की खोट आज सोक्षमोक्ष एकदाच लागूच दे.”

मनाशी तर त्याने हे सर्व ठरवलं होतच, पण जसजशी दुचाकी रस्त्यावर धावत होती तसतशी मनात भीतीने काहूर माजवला सुरुवात केलेली होती.

” ते जर का कोणी भूत वैगरे निघालं तर, छे……छे….. भूत वैगरे काही नसतं ते सर्व काल्पनिक गोष्टी मध्ये असत.” या विश्वासात त्याने अजून दुचाकीला वेग धरला. आणि अचानक त्याची पाठ कोणीतरी थोपटली. आणि राकेशने क्षणाचा पण विलंब न करता. आपल्या एका हाताने तो हात पकडला.

राकेशचे डोळे मोठे झाले आणि ते बघताच राकेशला आपले हसू नाही आवरले. सर्व जंगलात राकेशच्या हसण्याचा आवाज घुमला.

हातामध्ये त्याच्याच गळयात लटकवलेला टाय होता. म्हणजे तो दोन दिवसापासून ज्याला घाबरत होता. तो त्याचाच टाय होता. जो हवेच्या झोक्याने त्याच्याच पाठीवर थपथपत होता.

स्वतःच्याच डोक्याला चापट मारत तो घराच्या दिशेनं निघाला. घरी गेल्यावर हा विषय स्वातीला सांगायचं हे त्याने ठरवले.

स्वतः चाच वेंधळ पणामुळे त्याच्या चेहऱ्यावर हास्य तयार झाले होते.
थोडं अंतर कापल्यावर त्याच्या परत पाठीवर थोपटले. परंतु या वेळेस त्याने त्याकडे लक्ष नाही दिले.

तो भरवेगात आपलं घर जवळ करण्याचा नादात मागे बघायचं विसरला की या वेळेला टाय नसून एक भाजलेला विद्रुप हात त्याच्या पाठीवर थपथपत होता.


  • सागर राऊत

Share