विदर्भ भूषण (संत गाडगेबाबा कविता)

Sant Gadge Baba Kavita

विदर्भ भूषण

‘गोपाला गोपाला’ हा मंत्र आम्हा दिला
गोर-गरिबांच्या सेवे, जीव आपुला वाहिला

स्वतः असुनी निरक्षर दुजा केले तू साक्षर
लिहू लिहावे तरी, किती, कमी पडती अक्षर

दिन-दुबळ्यांची सेवा, अपंगांना तू आधार
नाही घेतला कधी तू कष्टाशिवाय आहार

अनाथाश्रम, अन्नछत्रे, तुझ्या आप्तांना पर्वणी
कीर्तनातून जनजागृती नाही विसरे कुणीही

चिंध्या, खराटा, खापर हेचि तुझे आभूषण
स्वच्छ गावं आणि मन, होई संस्कृती रक्षण

तुझ्या ओठी सरस्वती, हाती कष्टाचे साधन
नाही घेतले वेतन, नाही कधी मानधन

जुन्या रूढी परंपरा, दिला नाही त्यांना थारा
नवी दृष्टी दिली जना, दूर केला मोह सारा

मिरवितो आम्ही झेंडा, आम्ही साक्षर साक्षर
परी झाली दार्शनिका आमची तुझ्या पुढे हार

या संताचिये भूमी, तुम्ही विदर्भ-भूषण
कसे होऊ ‘बाबा’ आम्ही, तुमच्या ऋणातून मोचन!


प्रा. विनोद न. टेंभरे
हिवरखेड (रूप.) ९९७०२१६२१५

Share